

नागपूर (Nagpur) 01 सप्टेंबर 2024 :- आपल्याला जर व्यवसायाचा विस्तार करायचा असेल किंवा व्यवसायाला पुढच्या स्तरावर न्यायचे असेल तर त्याकरता धोरण तयार करणे, पुढचं नियोजन करणे याकडे लक्ष द्यावे लागते. अशावेळी काही किचकट कामे, तांत्रिक कामे हे इतरांना डेलिगेट करून अर्थात सोपवून तो वेळ वाचवणं महत्त्वाचं ठरतं असा सल्ला डीसी कन्सल्टंटच्या संस्थापक डॉ. रश्मी बंसल यांनी दिला. विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे आयोजित ‘एम्पॉवर की एम्प्लॉईज अँड फोकस ऑन ग्रोथ’ (Empower Key Employees and Focus on Growth) या सत्रात त्या आज बोलत होत्या.
बरेचदा आपल्याकडे अनेक कामं, प्रोजेक्ट्स एकच वेळी येत असतात. त्यातली काही महत्त्वपूर्ण असतात तर काही कमी महत्त्वाची असतात. त्यासाठी कामांची प्राथमिकता ठरवून जर ती कामे आपल्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन वाटून दिली किंवा त्यांना जबाबदारी निश्चित करून दिली तर आपल्यावरचा भार बऱ्यापैकी कमी होऊन आपण धोरणात्मक बाबींकडे लक्ष देऊ शकतो असं बंसल म्हणाल्या. याशिवाय नियुक्त केलेल्या व्यक्तीला आपण जर आवश्यक ते अधिकार दिले आणि त्याला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य दिलं तर तो ते काम अधिक प्रभावीपणे हाताळू शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं. याशिवाय यशस्वी व्यवसायासाठी दस्तऐवजीकरण, मानक कार्यप्रणाली आणि सकारात्मक दृष्टिकोन या बाबी देखील महत्त्वाचा असल्याचा त्यांनी म्हणाल्या. सत्राचे संचालन नीरज गांधी यांनी केले, रोहित दुजारी हे सत्र प्रभारी होते.