
मुंबई(Mumbai), 21 जून:- उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांचा डीपफेक व्हिडीओ वापरून एका महिला डॉक्टरची 7 लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. मुंबईच्या अंधेरी येथील ही डॉक्टर इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून या शेअर ट्रेडिंग घोटाळ्याला बळी पडली आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार इंस्टाग्रामवरील रील्समध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांचा एक डीपफेक व्हिडिओ वापरण्यात आला होता ज्यामध्ये ते ‘राजीव शर्मा ट्रेड ग्रुप’बद्दल बोलताना दिसत आहेत. बनावट व्हिडिओमध्ये, अंबानी लोकांना उच्च परतावासाठी या कंपनीच्या बीसीएफ इन्व्हेस्टमेंट अकादमीमध्ये सामील होण्यास सांगतात. मुकेश अंबानींचा हा दुसरा डीपफेक व्हिडिओ आहे. यापूर्वी मार्चमध्ये, असाच एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये तो स्टॉक ट्रेडिंग मेंटॉरशिप प्रोग्रामबद्दल बोलत होते. यामध्ये अंबानींना एआयच्या माध्यमातून लोकांनी ‘स्टुडंट व्हेनेट’ पेज फॉलो करावे, असे म्हणताना दाखवले होते. येथे इंटरनेट वापरकर्ते विनामूल्य गुंतवणूक सल्ला घेऊ शकतात असे आवाहन ही अंबानी यांनी केले होते.
मुंबईच्या डॉक्टर केके एच पाटील यांची फसवणूक 28 मे ते 10 जून दरम्यान झाली. या काळात त्यांनी एकूण 7 लाख रुपये वेगवेगळ्या 16 बँक खात्यांवर पाठवले. त्या बदल्यात त्यांना अंबानींकडून उच्च परतावा आणि प्रमोशनचे आश्वासन देण्यात आले होते. रिपोर्टनुसार, 7 लाख रुपये गमावल्यानंतर महिला डॉक्टरला तिच्या फसवणुकीची माहिती मिळाली. ती ट्रेडिंग वेबसाइटवर 30 लाख रुपये नफा दाखवत होती पण ती काढू शकली नाही. अशा स्थितीत शंका निर्माण झाली. याबाबत महिलेने पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणात भामट्यांनी डीपफेक तंत्रज्ञानाची मदत घेतल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिस बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. आता ज्या बँक खात्यांमध्ये महिलेने पैसे ट्रान्सफर केले होते ते बंद केले जात आहेत.