Accident: भरधाव ट्रकने धडक दिल्याने सहा महिला शेतमजुरांचा मृत्यू

0

सोलापूर(Solapur) ,19 जून :- सोलापूर जिल्ह्यातील महूद ते दिघंची रस्त्यावर सातपुतेवस्ती पाटीजवळ गावाकडे जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहनाची वाट पाहात उभ्या असलेल्या महिला मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले. या दुर्घटनेत सहा महिला मजूर ठार झाल्या असून, एक गंभीर जखमी आहे.

या अपघातातील मृत महिला मजूर कटफळ (ता. सांगोला) येथील आहेत.नेहमीप्रमाणे १४ हून अधिक महिला चिकमहूद हद्दीत कामाला आल्या होत्या. काम संपल्यानंतर त्या कटफळकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहात रस्त्याच्या कडेला बसल्या होत्या. पंढरपूरहून वीस चाकी मालवाहतूक ट्रक (एमएच ५० एन ४७५७) वळत असताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक महिला मजुरांच्या दिशेने भरधाव गेला. यात इंदूबाई बाबा इरकर (वय ५०), भीमाबाई लक्ष्मण जाधव (४५), कमल यल्लाप्पा बंडगर (४०), सुलोचना रामा भोसले (४५), अश्विनी शंकर सोनार (१३), मनीषा आदिनाथ पंडित (५०) या ठार झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर-कराड रस्त्यावर सांगोला तालुक्यातील चिकमहूद गावाजवळ काल, मंगळवारी हा अपघात झाला. सांगोला तालुक्यातील कटफळ येथील राहणाऱ्या आठ महिला शेतमजूर ऊस लावण्यासाठी चिकमहूद गावाखालील बंडगरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात गेल्या होत्या.