

चंद्रपूर :- शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक सचिन भोयर यांनी केला आहे. याबाबत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
भोयर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २२ ऑगस्ट २०२५ रोजी देवरानी तपन सरकार यांना प्रसूतीसाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या लॅब रिपोर्टमध्ये त्यांच्या प्लेटलेटची संख्या फक्त ५५ हजार असल्याचे दिसूनही डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. धोकादायक परिस्थितीत स्पायनल अॅनेस्थेसिया देण्याचा निर्णय घेतल्याने परिस्थिती बिघडली.
भोयर यांनी आरोप केला की –
रुग्णाला तात्काळ व योग्य पद्धतीने प्लेटलेट्स देण्यात आले नाहीत.
रक्तस्त्राव सुरू असूनही योग्य उपचारात विलंब झाला.
यामुळे रुग्णाला ‘ट्रान्सफ्युजन रिलेटेड ॲक्युट लंग इंज्युरी (TRALI) सिंड्रोम’ झाला आणि तिचा मृत्यू झाला.
महिलेचे पती देब्रुतो बिस्वास यांनी तक्रार दाखल केल्यानंतरही दोषींवर कारवाई झाली नाही. उलट, डीन डॉ. मिलिंद कांबळे यांनी दोषी डॉक्टरांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही भोयर यांनी केला. चौकशी समितीच्या अहवालात कोणतीही चूक झालेली नाही असे नमूद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा ठपका ठेवण्यात आला.
भोयर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की –
“हा प्रकार केवळ वैयक्तिक चूक नाही, तर एक गंभीर फौजदारी गुन्हा आहे. या प्रकरणात दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम ३०४अ (गैरइच्छिक खून) व १०६ अंतर्गत कठोर कारवाई करावी.”
भोयर यांनी इशारा दिला की, जर तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर मनसे मोठ्या संख्येने नागरिकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडेल.