
मुंबई (Mumbai)
गेल्या काही महिन्यांपासून महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाला आहे. त्यातच आता खाद्यतेल आणि इतर अनेक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. अनेक छोट्या-मोठ्या शहरात 500 रुपयांची नोट सुद्धा कमी पडत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात वस्तूंचे भाव कडाडले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या जीवाला घोर लागला आहे.सप्टेंबरनंतर राज्यातच नाही तर देशात महागाईने पुन्हा डोकं वर काढलं आहे. भाजपाल्यासह खाद्यतेल, दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शहरात दर वाढले आहेत. कांद्याचा थोडा बहूत दिलासा मिळत नाही तोच लसणाने गृहिणींच्या नाके नऊ आणले आहे. खाद्यतेलाच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्याने घरचे बजेट सांभाळताना लाडक्या बहिणींना मोठी कसरत करावी लागत आहे. या सर्व महागाईत संसाराचा गाडा कसा हाकायचा असा सवाल लाडक्या बहिणी सरकारला विचारत आहेत.
नवी मुंबईतील APMC भाजी मार्केटमध्ये हिवाळा सुरू असल्याने पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या किमतींमध्ये 30% घट झाली आहे सध्या पालेभाज्या प्रति 10 रुपये दराने विकल्या जात आहे. मागील तुलनेत हा दर खूपच कमी आहे.नवी मुबंईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे भाव वाढले. एपीएमसी बाजारपेठेत सध्या लसणाचे दर 300 ते 350 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रति किलो 20 रुपयांची वाढ झालेली आहे. व्यापार्यांच्या म्हणण्यांनुसार, सध्या बाजारात लसणाचा पुरवठा कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत.
















