

७ ऑगस्ट १९९० रोजी दत्ताजींचा वाढदिवस झाला. घरातच सर्वांनी तो साजरा केला. विद्यार्थी परिषद, मानस संस्था, संघ, विद्यापीठ या सगळ्या गोतावळ्यातला त्यांचा मित्रमेळा जमला. हास्यविनोदाची मैफिल रात्री उशिरापर्यंत चालली. दोनच दिवस झाले असतील या सोहळ्याला आणि एका विवाह समारंभात दत्ताजी गेले तेव्हा सोबतच्या सुरेश तापस आणि अन्य कार्यकर्त्यांनी म्हटले, ‘दत्ताजी, तब्येत बरी नाही का?’ नेहमीच्या समोर मध्ये त्यांनी म्हटले, ‘छे! असे काहीच नाही.’ तरीही त्यावर तापस म्हणाले, ‘तुम्ही व्यवस्थित जेवलाही नाहीत आणि तुमचे अंगही थोडे गरम वाटते आहे.’ ‘हां. गेल्या दहा-बारा दिवसांपासून भूक कमी लागते,’ दत्ताजी म्हणाले. त्याच दिवशी रात्री घरी गेल्यावर त्यांनी पुतण्याला म्हटले, ‘विज्या, पहा बरं माझ्या डोळ्यात पिवळसर झाक दिसतेय का?’ खरेच डोळे पिवळे दिसत होते. दुसऱ्याच दिवशी डॉक्टर शास्त्रींनी त्यांना तपासले. कावीळ झाली आहे असे म्हणून पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. १५ दिवसांनी पुन्हा तपासणी झाली तेव्हा कावीळचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले. कावीळ आहे हे लक्षात घेऊन गावठी औषधांचाही प्रयोग झाला, पण कावीळ आटोक्यात येत नव्हती. दत्ताजी घरातच बंदिस्त झाले. एवढेच नव्हे तर गप्पा, भेटीच्या मैफिलीही झेपेनाशा झाल्या. अशातच त्यांचे फॅमिली डॉक्टर शिलेदार त्यांना भेटायला आले. त्यांनी लगेचच मुंबईला जाऊन डॉ. श्रीखंडे यांना भेटण्यास सांगितले. पू. बाळासाहेब देवरस यांचे स्वीय सहाय्यक आबाजी थत्ते यांनी डॉ. श्रीखंडे यांची लगेच अपॉइंटमेंटही मिळवून दिली.
मुंबईला त्याच दिवसात विद्यार्थी परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू होती. त्यासाठी देशभरातील प्रमुख कार्यकर्ते मुंबईत जमले होते, त्यामुळे दत्ताजींना मुंबईला नेण्यात आले तेव्हा परिषद कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. सर्व सुहृदांना एकत्र पाहून दत्ताजींच्या क्लांत मुद्रेवर आनंदाची छटा उमटली. पण कार्यकर्त्यांची मने मात्र दत्ताजींना बघून उदास झाली. डॉ श्रीखंडे आणि त्यांचे सहाय्यक डॉ. नांदे यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दत्ताजींची पूर्ण तपासणी केली आणि एका लहानशा शस्त्रक्रियेची शिफारस केली. २७ सप्टेंबर रोजी ती शस्त्रक्रियाही पार पडली. परंतु या सर्व प्रक्रियेत दत्ताजींच्या पित्ताशयाच्या नलिकेला कर्करोगाची लागण झाल्याचे लक्षात आले आणि सर्वजण हबकूनच गेले. याच दरम्यान विजयादशमीचा दिवस आला. परिषद कार्यकर्त्यांनी तो दसरा डिडोळकर कुटुंबाच्या सानिध्यातच साजरा केला. गंभीर आजाराच्या सावटाखालीच- पण कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या गप्पा झाल्या. पुढील उपचार आणि नागपूरला परतणेच श्रेयस्कर आहे असा सल्ला डॉ. नांदे यांनी दिला आणि २ ऑक्टोबरला मंडळी दत्ताजींना घेऊन पुन्हा केदारमध्ये परतली. दोनच महिन्यांपूर्वी ७ ऑगस्ट रोजी वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने उत्साहाने रसरसलेल्या केदारवर उदासपणाची छाया पसरली.
दत्ताजींच्या आजाराचे वृत्त समजताच पू. बाळासाहेब देवरस त्यांना भेटण्यासाठी घरी आले. ते आलेले पाहताच दत्ताजी पलंगावर उठून बसण्यासाठी धडपडू लागले, परंतु बाळासाहेबांनी त्यांना उठू दिले नाही. सरसंघचालक भेटायला आल्याविषयीची कृतज्ञता, धन्यता आणि आपण उठून बसू शकत नाही याबद्दलची खिन्नता यांचे संमिश्र भाव दत्ताजींच्या मुद्रेवर पसरले. बाळासाहेबांनाही गलबलून आले. त्यांनी दत्ताजींचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन म्हटले, “तुम्ही तर स्वभावतःच साहसीआहात. हिंमत हरू नका. भिण्याचे कारण नाही. सर्व काही ठीक होईल…!” दत्ताजींनी दोन्ही हात जोडून बाळासाहेबांना प्रणाम केला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जणू बाळासाहेबांच्या शब्दांतील उसना आवेश त्यांना जाणवला होता. आपल्या आयुष्यभराचे आराध्य असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना आपण करीत असलेला हा शेवटचा प्रणाम असल्याचेही त्यांनी मनोमन जाणले असावे. दोघे दिग्गज स्नेही काही क्षण एकमेकांकडे पाहत स्तब्ध बसून होते. बाळासाहेबांच्या डोळ्यांतून उत्कट स्नेहाचा, तर दत्ताजींच्या डोळ्यांतून विनम्र कृतज्ञतेचा झरा ओसंडून वाहत होता. काही वेळानंतर सोबतच्या कार्यकर्त्यांसह बाळासाहेब तिथून बाहेर पडले. दत्ताजींच्या नजरेआड झाल्यानंतर मात्र त्यांना आपली वेदना आवरणे शक्य झाले नाही. वाहनात बसताबसता रुद्ध स्वरात ते म्हणाले, “मीच दत्ताजींना प्रचारक म्हणून नागपूरहून मद्रासला पाठविले होते. अनेकांना माहीत नसेल की आज कन्याकुमारीला स्वामी विवेकानंदांचे जे भव्य स्मारक दिसते आहे त्याची संकल्पना सर्वात प्रथम दत्ताजींच्याच मनात निर्माण झाली होती. त्यांच्या प्रेरणेनेच स्वामीजींच्या जन्मशताब्दी वर्षात समुद्रातील खडकावर स्वामीजींची प्रतिमा स्थापित करण्यात आली आणि ती प्रतिमा काढून तेथे क्रॉस लावणाऱ्या ईसाई उपद्रवकारी लोकांशी संघर्ष करण्याचा प्रसंग उद् भवला तेव्हा दत्ताजींच्याच साहसी नेतृत्वाखाली त्या उपद्रवाशी समर्थ झुंज देण्यात आली होती. पुढे तेथे भव्य स्मारक उभे करण्याचे विराट अभियान एकनाथजी रानडे यांच्या नेतृत्वाखाली देशभरात चालविण्यात आले. त्यातही दत्ताजींचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.”
नागपूरला परतल्यावर शक्य ते उपचार आणि संपूर्ण विश्रांती याखेरीज दुसरे काहीच करण्यासारखे नव्हते. स्वतः दत्ताजी अत्यंत व्यथित मनाने आल्या परिस्थितीला सामोरे जात होते. असे एकांत-स्वस्थ बसणे खरंतर क्षणभरासाठीही त्यांना मानवणे शक्य नव्हते. त्याचीच अपार व्यथा त्यांच्या मनावर आणि मुद्रेवर पसरलेली असायची. अशा अटळ आणि काहीशा अगतिक अवस्थेत दत्ताजींनी फार दिवस काढले नाहीत. भेटायला येणाऱ्या लोकांची अक्षरश: रीघ लागली. केदारमध्ये राहणारा विजय, त्याची पत्नी रागिणी, दत्ताजींच्या बहिणी, नातवंडे, अमेरिकेत असणारा अशोक आणि फरीदाबादला असणारा रवी हे दोघेही पुतणे… सारे आप्तेष्ट त्यांच्याभोवती सेवाशुश्रुषेत होते. १४ ऑक्टोबरचा दिवस नीटसा उजाडलाही नव्हता. पहाटे पाचचा सुमार असेल. दत्ताजींना अस्वस्थ वाटू लागले. कुटुंबीय मंडळींनी लगेचच जवळच राहणारे डॉ. नटराजन अय्यर आणि डॉ. शिलेदार या दोघांना बोलावले. दोघे तत्परतेने आलेही, पण ते येण्यापूर्वीच दत्ताजींनी अखेरचा श्वास घेतला. एक शांत वादळ निवांत झाले.
एखाद्या प्रशांत, निर्मळ, नितळ, स्वच्छ जलाशयाचे प्रतिरूप हीच दत्तात्रय देविदास डिडोळकर या व्यक्तिमत्त्वाची आता चिरस्थायी आठवण राहिली आहे. आज ७ ऑगस्ट २०२४ रोजी दत्ताजींच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होताना त्यांच्याविषयीची ऋणभावना उरी-शिरी बाळगणे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी राष्ट्रकार्यार्थ क्रियाशील होण्याचा संकल्प जागविणे हीच त्यांना सर्वोत्तम आदरांजली ठरेल.
(श्री. अरुण करमरकर यांनी लिहिलेल्या ‘आधारवड’ या दत्ताजींच्या चरित्रातील संपादित अंश)”अभाविप मैत्र जिवाचे फेसबुक पेजवरून साभार.”