
गोंदिया – गोंदिया खरीप हंगामातील धानाची कापणी व मळणीदरम्यान नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील 25 हजार 700 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. तर 53 हजार 296 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 43 कोटी 34 लाख रुपयांची मागणी केली आहे. यासंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात 1 लाख 12 हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. सुदैवाने धानाला अनुकूल वातावरण मिळाल्याने पीकसुद्धा चांगले होते. काही शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हे धान दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी या धानाची विक्री करून दिवाळी साजरी करतात. मात्र, यंदा खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी सुरु असताना 27 आणि 28 नोव्हेंबर अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा 4 ते 6 डिसेंबरदरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात कापणी केलेल्या कडपा भिजल्याने धानाचे नुकसान झाले. तर शेतातील बांध्यांमध्ये पाणी साचल्याने धानाच्या पुंजाण्यांमध्ये पाणी गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. दरम्यान शासनाने अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यात कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेने पंचनामे करुन नुकसानाचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. आता शासन यावर कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.