स्विमींग पूलमध्ये आढळली मगर!

0

 

मुंबई : मुंबईच्या दादर येथील महात्मा गांधी मेमोरियल स्विमिंग पूलमध्ये मगर आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. (crocodile in mumbai swimming pool) या स्वीमिंग पूलमध्ये मगरीचे एक पिल्लू विहार करत असल्याचे आढळून कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे स्वीमिंग पूल कर्मचाऱ्यांची अक्षरशः धांदल उडाली. मगरीनं एका कर्मचाऱ्याला इजा केल्याचेही सांगण्यात येते. मगरीला पकडून तेथून नेण्यात आले.

कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीनं हालचाल करून या मगरीला पकडले आणि ड्रममध्ये बंद केले. यानंतर वन विभाग, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळवण्यात आले. या स्विमींग पूलच्या शेजारी असलेल्या प्राणीसंग्रहालयातून ही मगर स्विमिंग पूलमध्ये आली असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी अजगर आणि सापासारखे काही प्राणी त्याच प्राणीसंग्रहालयातून सुटून बाहेर आल्याने प्रचंड घबराट पसरली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा गांधी जलतरण तलावाच्या बाजूला असलेले हे प्राणीसंग्रहालय बेकायदा आहे. हा प्रकार एखाद्याच्या जिवावर बेतल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. अशा प्रकारचे प्राणी पाळण्याची परवानगी कोणी दिली? या प्राणी संग्रहालयाला कोणाचा राजकीय आशीर्वाद आहे? ही जागा महापालिकेची आहे, तरी कारवाई का होत नाही, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.