

Crime News : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाला धमकीचा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Crime News : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या (Nagpur Bench of Mumbai High Court) ऑफिशियल ई-मेल आयडीवर ‘मद्रास टायगर’ या नावाने आलेल्या बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा मेल मिळाल्यानंतर तत्काळ सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
बॉम्बशोधक व नाशक पथक (BDS), तसेच श्वान पथक आणि पोलीस दलाने खंडपीठाच्या इमारतीत व संपूर्ण परिसरात सखोल तपासणी करण्यात आली, मात्र संशयास्पद कोणतीही वस्तू आढळून आली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
‘मद्रास टायगर’ या नावाने धमकी
विशेष म्हणजे, ‘मद्रास टायगर’ या नावाने इतर काही शहरांतील उच्च न्यायालयांच्या इमारतींना देखील स्फोटाने उडवून देण्याची धमकी याआधी मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात असून, संपूर्ण तपास सायबर पोलीस विभागाकडे सोपविण्यात आला आहे. धमकीचा मेल नेमका कोणी पाठवला? कुठून पाठवला? हे शोधण्यासाठी नागपूर पोलिसांची सायबर टीम सर्व तांत्रिक बाबींचा तपास करत आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागपूर खंडपीठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, पोलिसांनी घेतलेल्या तातडीच्या उपाययोजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आहे.
छत्रपती संभाजीनगर खंडपीठाला देखील धमकीचा ई-मेल
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला देखील बॉम्बस्फोटाची धमकी देणारा एक ई-मेल प्राप्त झाला आहे. हा मेल चेन्नई येथून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी संपूर्ण न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. न्यायालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास ई-मेल आला. उच्च न्यायालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी खंडपीठ परिसरात तपास सुरू केला. न्यायालयाच्या संपूर्ण परिसरात बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. न्यायालयातील सर्व कामकाज नियमित सुरू आहे. नागरिकांना देखील न्यायालयात येण्यास परवानगी देण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा दक्षतेने काम करत असून, सायबर पोलिसांकडून धमकीच्या ई-मेलचा सखोल तपास सुरू आहे.