

(Gondia)गोंदिया– क्रेडिट कार्डवर लोन मिळवून देण्याच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून 7 लाखांचे लोन घेऊन 70 टक्के रक्कम आपल्या खात्यावर वळवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेलने केला आहे. या प्रकरणात सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील खाडीपार येथील होमगार्ड धनराज पुंडलिक सयाम (30) यांना ऑक्टोबर 2023 मध्ये क्रेडिट कार्डवर 7 लाख रुपयांचे लोन मिळवून देण्यासाठी त्यांच्या नावाने बनावट कागदपत्र तयार केले. त्यांच्या नावावर 7 लाखांचे लोन मंजूर झाले असताना आरोपींनी त्यांच्या अकाउंटवर फक्त 2 लाख 37 हजार रुपये एवढीच रक्कम जमा केली. उर्वरित 4 लाख 63 हजार रुपये त्यांच्या संमतीशिवाय इतर ठिकाणी वर्ग केली. त्यांच्याबरोबर इतर लोकांचीही फसवणूक केली आहे. या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात आरोपींवर भादंवि कलम 406, 420, 467, 468, 471, 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता व क्रेडिट कार्डच्या नावावर जिल्ह्यातील लोकांची मोठ्या प्रमाणावर झालेली आर्थिक फसवणूक पाहता गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ जेरबंद करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आरोपींचा शोध घेऊन अटक केल्याची माहिती निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी दिली.