

‘शिवप्रभू झाले छत्रपती’ या ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण
नागपूर(Nagpur), 26 जुलै-छत्रपती शिवाजी महाराज या महान विभूतीवर महाराष्ट्रासह संपूर्ण जगाची असीम श्रद्धा आहे. त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेतूनच उत्कट भाव निर्माण होतो. अशा स्थितीत शिवगौरव गीतासारखी निर्मिती होते, असे प्रतिपादन धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांनी केले.
जयप्रकाशनगर येथील गुरुमंदिरात अष्टपैलू कवी अनिल शेंडे यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर आधारित ‘शिवप्रभू झाले छत्रपती’ या शिवगौरव गीताच्या ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांच्या हस्ते थाटात झाले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज, शिवगौरव गीताचे लेखक कवी अनिल शेंडे व अस्मिता शेंडे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सद्गुरुदास महाराज यांनी उपनिषदामधील एक गोष्ट सांगत एकाच शब्दाचे कसे अनेक अर्थ निघतात हे स्पष्ट केले व उत्कट भावातून निर्माण होणारे गीत हेच पुढे गीता होते, असे सांगितले. कवी अनिल शेंडे यांनी छत्रपतींप्रति दास्यत्व भावातून गीताची निर्मिती केल्यामुळे ते अधिक प्रेरणादायी ठरले आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, या गीताचा ऑडिओ आणि व्हिडिओ सर्व उपस्थितांना ऐकविण्यात आला.
प्रास्ताविकात कवी अनिल शेंडे म्हणाले, शिवाजी महाराजांवर थोडक्यात पण परिपूर्ण गीत लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. याचे लोकार्पण सद्गुरुदास महाराजांच्याच हस्ते व्हावे ही माझी इच्छा आज पूर्ण झाली, असे मत व्यक्त केले. हे गीत गौरव चाटी यांनी गायले असून, संगीत संयोजन प्रशांत लळीत यांनी, तर त्याचा व्हिडिओ चारूदत्त जिचकार यांनी तयार केला आहे.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमर देशपांडे यांनी, तर आभार प्रदर्शन अस्मिता शेंडे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. विलास डांगरे, सुरेश घड्याळपाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.