

वर्धा(Wardha), दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा तसेच वाहतुक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात दि. 24 ते 27 मे, 2024 या कालावधीत पथकांव्दारे अवैध वाळू वाहतुक करणारे एकूण 12 वाहने व 36 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.
अवैध वाळू वाहतुकीला आळा खालण्यासाठी भरारी पथके तसेच स्थायी निगरानी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसीलदार यांच्या पथकाव्दारे वर्धा तालुक्यात 4 ट्रक व 24 ब्रास वाळू, देवळी तालुक्यात 2 टिप्पर, 1 ट्रॅक्टर व 7 ब्रास वाळू, हिंगणघाट तालुक्यात 1 ट्रॅक्टर व 1 ब्रास वाळू, समुद्रपूर तालुक्यात 3 ट्रक 3 ब्रास वाळू व आर्वी तालुक्यात 1 ट्रॅक्टर व 1 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार कारवाई करण्यात येत आहे, असे अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी कळविले आहे.
000000