देशमुख कुटुंबियांना न्यायालयाचा दिलासा

0

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दोन्ही मुले हृषिकेश व सलील यांचे पासपोर्ट त्यांना परत करण्याचे निर्देश विशेष पीएमएलए न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला दिले आहेत. त्यांनी न्यायालयाच्या पूर्व पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहे जाऊ नये, अशी अटही न्यायालयाने हे आदेश देताना घातली आहे. (PMLA Court Order)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांच्याबरोबरच हृषिकेश व सलीलही आरोपी आहेत. त्यांना न्यायालयाने पूर्वी जामीन मंजूर करताना घातलेल्या अटींमध्ये पासपोर्ट ईडीकडे जमा करण्याची एक अट होती. त्यानुसार त्यांचे पासपोर्ट ईडीच्या तपास अधिकाऱ्याकडे होते. केवळ मनी लाँड्रिंगचा गुन्हा असणे पासपोर्ट नाकारण्यास पुरेसे कारण नाही आणि कठोर अटी लावून तपास संस्थेच्या भीतीची योग्य ती दखल घेता येईल. कथित गुन्ह्याचे स्वरूप, आरोपीची पार्श्वभूमी, खटल्यातील उपस्थितीची आवश्यकता या घटकांसह आरोपीचे व्यक्तिगत स्वातंत्र्यही लक्षात घेऊन न्यायालयाला संतुलन साधावे लागते. त्यामुळे अटी घालून पासपोर्ट परत करण्याचा आदेश देण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.