या दिवशी होणार मतमोजणीला सुरुवात

0

अमरावती,(Amravti) 16 मे – लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जूनला येथील लोकशाही भवनात होईल. यासाठी अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा दल असे किमान १,९०० मनुष्यबळ लागणार आहे. यामध्ये मतमोजणीला कमी व इतर कामांसाठी जास्त कर्मचारी राहतील. अशी एकूण स्थिती आहे. यासाठी निवडणूक विभागाची तयारी सुरू झालेली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रक्रिया गतिमान होईल.

लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सहा विधानसभा मतदारसंघांतील सर्व ईव्हीएम विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवनात असलेल्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी ४ जूनला सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्यक्षात त्याच्या दोन तास अगोदरपासून यंत्रणा उपस्थित राहणार आहे. यावेळी निवडणूक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी व सहा एआरओदेखील राहणार आहेत.

प्रत्येक मतदारसंघात १८ टेबलवर मतमोजणी होईल. मतमोजणीला नऊ तहसीलदार तथा मतमोजणी पर्यवेक्षक, कर्मचारी व मायक्रो ऑब्झर्व्हर, असे ३०० वर अधिकारी व कर्मचारी राहतील. याशिवाय टॅबूलेशन व पोस्टल बॅलेटकरिता अधिकारी व कर्मचारी राहतील. या अनुषंगाने प्रक्रियेचे नियोजन सुरू आहे. आवश्यक मनुष्यबळास प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार प्रवीण देशमुख यांनी दिली.

या व्यतिरिक्तही लागणार मनुष्यबळ

मतमोजणी प्रक्रियेसाठी आत व बाहेर, असे एकूण एक हजारावर पोलिस अधिकारी व कर्मचारी राहतील. आयोगाला अहवाल पाठविणे यासोबतच अग्निशमन, पाणीपुरवठा, आरोग्यासाठी सीएस व डॉक्टर, विद्युत विभाग, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, हमाल, मंडप, विद्युत अभिकर्ता व त्यांचे प्रतिनिधी व इतर, असे एकूण दीड हजारावर अधिकारी व कर्मचारी राहणार आहेत.