….भ्रष्ट्र वाळवीने कला खाल्ली !

0

पोंक्षेच्या परखड घुटीने कलाकारांना शब्द फुटले
सांस्कृतिक वास्तूच्या असांस्कृतिकीकरणावरून हल्लाबोल

अमरावती
 @ अमरावती: सांस्कृतिक नगरीचा नावलौकिक मिरवणाऱ्या अमरावतीत आता कलाकारांना वाव उरला नसल्याची खंत रंगकर्मी शरद पोंक्षे यांनी शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाची दुरावस्था-अव्यवस्था व असांस्कृतिकीकरण बघून जाहीर मांडली. पोंक्षेच्या परखड घुटीने आता अन्य कलाकारांनाही शब्द फुटले आहेत. ….भ्रष्ट्र वाळवीने कला खाल्ली, महानगरपालिकेने शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या सांस्कृतिक भवनासह रसिकांच्या भावनांचाही सत्यानाश केला. असा संतप्त सूर या सांस्कृतिक वास्तूच्या असांस्कृतिकीकरणावरून कलाकारांत उमटला आहे.

जेष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे अभिनीत ‘मी नाथुराम बोलतोय’ या नाटकाचा प्रयोग संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे नुकताच पार पडला. यावेळी त्यांनी अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात कला सादर करणे म्हणजे तारेवरची कसरत असल्याचे सांगत त्यांनी या सांस्कृतिक दुरावस्थेवरून महानगरपालिकेसह स्थानिक पुढाऱ्यांचेही परखड शब्दांत कान टोचले. यावेळी त्यांनी विदर्भाच्या सांस्कृतिक राजधानीमधे असलेल्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहाची दारुण अवस्था वर्णन केली. त्यांनतर आता या सांस्कृतिक वास्तूत चालणारे असांस्कृतिक कार्यक्रम, महापालिकेचे अधिकारी-कंत्राटदार यांच्यातली आर्थिक लाभाची ठेकेदारी अश्या अनेक मुद्द्यांवरून रंगलेल्या चर्चामुळे वातावरण तापू लागले आहे.

सांस्कृतिक चळवळी टिकवायच्या असतील तर …

‘मी नाथुराम बोलतोय’ या नाटकाच्या शेवटी रसिकांशी संवाद साधताना शरद पोंक्षे यांनी विदर्भाच्या सांस्कृतिक राजधानीमधे असलेल्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहाची दारुण अवस्था वर्णन केली. या भवनात कला सादरीकरणासाठी येणाऱ्या महिला कलाकारांना स्वच्छ प्रसाधनगृहही उपलब्ध नसल्याने त्यांची होणारी कुचंबणा, स्टेजवर पडलेले खिळे झाडायला माणूस नाही. स्टेजवरील पडदा दोन लोकांना ओढावा लागतो. येथील साउंड तर सगळ्यात बेकार. त्यामुळे रसिकांना नाटकाचा आवाजच ऐकू येत नाही. एखाद्या सांस्कृतिक वस्तूची दुरावस्था आणखी काय असावी ? सांस्कृतिक चळवळी चालवायच्या असतील व त्या टिकवायच्या असतील तर खऱ्या अर्थाने आता काम करण्याची वेळ आहे. केवळ सांस्कृतिक राजधानी हे बीरुद लावून धन्यता मानने आता बंद करायला हवे. राजकीय पक्ष किंवा कुणाची सत्ता हे विसरून कलेचा वारसा जपण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. कुणी काम केले याच्या श्रेयाची काळजी न करता, काही कामे श्रेयापेक्षा गावासाठी केली जातात त्यातील हे काम आहे. रंगमंचावर वावरताना आपण स्टेजवर फसून पडू अशी भिती अभिनेत्यांना वाटत असेल तर आपले काहीतरी चुकतेय. नाव कोणते द्यायचे किंवा पुतळे कुणाचे उभारायचे यापेक्षा सुविधा कश्या आहेत ते फार महत्वाचे होय. अश्या शब्दात शरद पोंक्षे व्यक्त झाले.

नाट्यगृह या मूळ संकल्पनेची लक्तरे वेशीवर
कलाकारांना राजकारणात जातांना आपण नेहमीच बघतो. पण जेव्हा राजकारणी कला करायला लागतात तेंव्हा खऱ्याखुऱ्या जिवंत कलाकाराची व कलेची काय अवस्था होते, हे अमरावतीत घडलेल्या नाट्य अनुभवातून बघायला मिळाले. जेंव्हा अमरावती मध्ये सांस्कृतिक संकुल या नाट्यगृहाची निर्मिती झाली, तेंव्हा येथील कलारसिकांना काय अपार आनंद झाला होता. पण, फारच थोड्या काळात, नाट्यगृह ही मूळ संकल्पना बाजूला सारून येथे अधिवेशन, लग्न असे एक ना अनेक कार्यक्रम लादून या रंगमंचाची लक्तरे करण्यात आली. मात्र शरद पोंक्षे या स्पष्ट व्यक्त्याने जेंव्हा अमरावती नाट्यगृहाची जाहीर लक्तरे काढली, तेंव्हा येथील पोकळ व्यवस्थेची व नाट्यगृहाच्या नावाखाली ठेंगाच राहिल्याची जाणीव अमरावतीकरांना झाली. ते म्हणाले अभिनय करतांना येथील रंगमंचावरून कधी खाली पडू अशी अवस्था आहे. बिचाऱ्या पोंक्षेना हे कोणी सांगावं की, येथे पाडापाडीच्या राजकारणात आम्ही मुद्दाम रंगमंचावर खड्डे ठेवले, म्हणजे एखाद्या राजकीय कार्यक्रमात विरोधक त्यात पडावाच. येथे सांउड सिस्टीम आम्ही मुद्याम लावत नाही, जेणे करून आवाज कुणाचा … ही आरोळी ठोकता येईल. हा मंच जास्तीत जास्त राजकीय कलाकारच वापरतात कारण अमरावती शहरात राजकारण असो वा प्रशासन, हरहुन्नरी कलाकारांची कमी नाही.संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, येथील सुविधा या व्यावसायिक नाट्यगृह म्हणून वापरण्याजोग्या नाही व त्यामुळे ते नाट्यगृह म्हणून उरले नाही अशी प्रतिक्रिया पीयूष जोशी यांनी दिली.

थोडी जो दी पनाह,तो बाप की जागिर समझ बैठे!
अमरावती शहरातील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन म्हणजे नाट्यरसिकांचे पूर्ण झालेले एक स्वप्न होय. कारण त्या आधी जोशी सभागृह ,नगर वाचनालय व वनिता समाज हेच नाट्यगृह कम हॉल होते. यानंतर थोडे अद्ययावत टाऊन झाले परंतु सर्व सोयी युक्त वातानुकूलित व नाटकाचे निकष नियम पूर्ण करीत श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन निर्माण झाले. त्याचे काही दिवस नेहमी प्रमाणे कौतुक झाले, पण अमरावती मनपाने नेहमी प्रमाणे त्याच्याही मानगुटीवर ठेकेदार बसवले ज्यांनी या वस्तूला मंगल कार्यालय करून टाकले. त्यानंतर घरजावई आणावा तसे परमनंट ठेकेदार म्हणून कुंकू एकाचे मंगळसूत्र दुसऱ्याचे व नांदवते तिसरा अशी गत या वास्तूची झाली, अन त्यानी आपल्या बापाची जागिर समजून मुजोरी अरेरावी व आर्थिक लाभ बस एवढंच महत्वाचे समजून नाट्यगृह व त्यासंबंधी झालेल्या कराराचा सत्यानाश केला. त्यामुळे आता या भवनाच्या कराराचे नियम पुन्हा तपासून व्यवस्थापनात सुधार करावा. सांस्कृतिक भवन आहे म्हणून ठेकेदार आहे, ठेकेदार आहे म्हणून सभागृह नाही याचे भान मनपा व ठेकेदार दोघांनी राखावे असे स्थानिक कलाकार मंगेश ठाकरे म्हणाले.