

दीक्षाभूमीवर 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा संपन्न
नागपूर (nagpur)ता. 13:
68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर दर्शनासाठी आलेल्या लाखो अनुयायांना नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेल्या सोयीसुविधांमुळे दिलासा मिळाला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार दीक्षाभूमी आणि परिसरात मनपाद्वारे पुरविण्यात आलेल्या सोयी सुविधांमुळे अनुयायांना दिलासा मिळाला.
शनिवारी (ता.12 )दीक्षाभूमीवर 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा करण्यात आला. याकरिता देशभरातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर दर्शनासाठी आले होते. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी (Dr. Abhijeet Chaudhary) यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वात उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, डॉ. गजेंद्र महल्ले, श्री. गणेश राठोड, सहायक आयुक्त श्री. अशोक घरोटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर यांच्या देखरेखीत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांच्या सुविधेच्या दृष्टीने मनपातर्फे सर्व व्यवस्था करण्यात आलेली होती.
मनपा नियंत्रण कक्षाच्या माध्यमातुन कुठल्याही परिस्थितीसाठी मनपा प्रशासन पूर्णतः सज्ज होते. वर्दळीत आपल्या आप्तस्वकीयांपासून दुरावलेल्या अनुयायांच्या मदतीसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात स्थित नियंत्रण कक्षामधून लाऊडस्पिकर द्वारे तात्काळ मदत देण्यात आली.
मनपाचे स्वच्छता कर्मचारी २४ तास कार्यरत
दीक्षाभूमी परिसराच्या स्वच्छतेसाठी मनपातील स्वच्छता कर्मचारी २४ तास कार्यरत होते. दीक्षाभूमी परिसराच्या चारही बाजूच्या रस्त्यांची साफसफाई करण्यात यावी याकरिता मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच अनुयायांसाठी महानगरपालिकेद्वारे 950 शौचालयाची व्यवस्था करण्यात आली होती. तर नीरी रोड, काछीपुरा चौक, रहाटे कॉलनी चौक, लक्ष्मीनगर चौक मोबाईल टॉयलेट तयार करण्यात आले होते. याशिवाय परिसरात सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री अनुयायांना असुविधा होऊ नये याकरिता रस्त्यावरील पथदिवे सुरू ठेवण्यात आले होते. तसेच आवश्यक ठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्यात आली होती. दीक्षाभूमीच्या सभोवतालच्या परिसरात जागोजागी व नागपूर शहरात सुध्दा जागोजागी दीक्षाभूमीकडे जाणा-या दीक्षाभूमीकडून इतर ठिकाणी जाणारे रस्ते, कोणती मुलभुत सुविधा कोणत्या ठिकाणी आहे याबाबत दिशादर्शक व स्थळ दर्शक नकाशे प्रदर्शित करुन अनुयायांना स्थळे सुलभरित्या प्राप्त होणे विषयी सुविधा पुरविण्यात आली.