लाडक्या बहिणींमुळे थकली कंत्राटदारांची एक लाख कोटींची बिलं!

0

मुंबई: महाराष्ट्रातील ठेकेदारांनी सरकारकडे थकीत असलेले १ लाख कोटींहून अधिक रकमेच्या थकीत बिलांसाठी राज्यातील कंत्राटदारांनी प्रकर्षाने मागणी नोंदविली असून, रक्कम न मिळाल्यास ५ फेब्रुवारीपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे.

येथे जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकातून कंत्राटदार संघटनेने आरोप केला आहे की, राज्य सरकार पायाभूत सुविधांसाठी झालेल्या कामांची देयके अदा करण्याऐवजी कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत आहे. त्यामुळे राज्यासमोर सध्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. याही स्थितीत सरकारकडून कल्याणकारी योजनांना प्राधान्य, ठेकेदारांना दुय्यम स्थान दिले जात आहे.

सरकारतर्फे बिलांची रक्कम प्राप्त न झाल्याने, विविध कंत्राटी कंपन्यांकडे कार्यरत सुमारे ४ कोटी कामगारांना नियमित वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी या थकबाकीचा आर्थिक फटका ठेकेदारांसोबतच त्यांच्याकडे कार्यरत कर्मचाऱ्यांना देखील बसत आहे.

प्राप्त माहितीनुसार, राज्य सरकार अंतर्गत कार्यरत महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांतर्गत झालेल्या कामांची देयके अदा केलेली नाहीत. गेल्या आठ महिन्यात सुमारे १ लाख कोटींहून अधिक रकमेची थकबाकी त्यामुळे तयार झाली असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे. ही रक्कम तातडीने अदा करण्यात यावी, अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेने सरकारला, येत्या ५ फेब्रुवारीपासून राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

एमएससीएचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी यासंदर्भात सांगितले की, सार्वजनिक बांधकाम या एकाच विभागाची सुमारे ४६,००० कोटी रुपयांची थकबाकी जुलै २०२४ पासून प्रलंबित आहे. पायाभूत सुविधा आणि विकास क्षेत्रातील सुमारे ४ लाख ठेकेदार आणि ४ कोटी कामगार यामुळे आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. सरकार आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असून, केवळ जाहिरातबाजीसाठी मोफत योजना वाटपावर भर देत आहे, असा आरोप देखील मिलिंद भोसले यांनी केला आहे.

मुंबई कंत्राटदार संघटनेचे कार्याध्यक्ष दादा इंगळे यांनी सांगितले की, मुंबई सर्कलच्या तीन विभागांत सुमारे ६०० कोटी रुपयांची बिले अजूनही थकीत आहेत. विकास प्रकल्पांमध्ये अनेक लहान ठेकेदार आणि बेरोजगार तरुणांनी गुंतवणूक केली आहे. परंतु प्रलंबित देयकांमुळे त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, कंत्राटदार संघटनेने दावा केला आहे की विविध विभागांकडून एकूण १,०९,३०० कोटी रुपयांची बिले अजूनही थकीत आहेत. यामध्ये, सार्वजनिक बांधकाम विभाग ४६,००० कोटी, जल जीवन मिशन १८,००० कोटी, ग्रामीण विकास विभाग८,६०० कोटी, सिंचन विभाग१९,७०० कोटी, नागरी विकास विभाग १७,००० कोटी आदींचा समावेश आहे.

 

कल्याणकारी योजनांसाठी निधी, 

पण ठेकेदारांची बिले मात्र प्रलंबित?

राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरणाऱ्या 

लाडकी बहीण या सारख्या योजनांना सरकार प्राधान्य देत असून, ठेकेदारांची थकीत बिले मात्र मागे ठेवली जात आहेत, असा कंत्राटदारांचा आरोप आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली असून, २.४३ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेसाठी २१,००० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. इतर क्षेत्रांमध्ये आर्थिक अडचण असतानाही, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेचा निधी कमी केला जाणार नाही. जरी काही लाभार्थी अयोग्य ठरले तरी. सरकारकडून त्यांना निधी वितरणाचे आश्वासन देण्यात आले आहे.

दरम्यान, कंत्राटदारांनी रोष व्यक्त केल्यानंतर, गृहनिर्माण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी कंत्राटदारांचे आरोप फेटाळून लावत, निवडणूक आचारसंहितेमुळे निधी वितरण लांबणीवर पडल्याने ही बिले अदा होऊ शकली नसल्याचे सांगितले. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर तोडगा काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.