

बाबा रामदेव-आचार्य बाळकृष्ण यांची स्वीकारली माफी
नवी दिल्ली (New Delhi) :- पतंजली आयुर्वेद आणि योगगुरू स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील न्यायालयाचा अवमान खटला बंद केला आहे. न्यायालयाने या दोघांनाही कडक ताकीद देताना सांगितले की, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून काही केले तर न्यायालय कठोर शिक्षा देईल. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने मंगळवारी (13 ऑगस्ट) हा निकाल दिला. 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अवमान नोटीसवरील निर्णय राखून ठेवला होता. सुप्रीम कोर्टाने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी केली होती, ज्यामध्ये कोविड लसीकरण आणि ॲलोपॅथीची बदनामी केल्याचा आरोप होता.
सर्वोच्च न्यायालयाने 21 नोव्हेंबर 2023 रोजी सांगितले होते की पतंजली (Patanjali) आयुर्वेदाने आश्वासन दिले आहे की यापुढे कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होणार नाही, विशेषत: त्याच्या उत्पादनांच्या जाहिराती किंवा ब्रँडिंगदरम्यान. तसेच, औषधांच्या प्रभावाचा दावा करणारे किंवा कोणत्याही वैद्यकीय पद्धतीच्या विरोधात कोणतेही विधान कोणत्याही स्वरूपात माध्यमांना जारी केले जाणार नाही. पतंजली हे आश्वासन देण्यास बांधील असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. पण, असे असतानाही स्वामी रामदेव यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये पत्रकार परिषद घेतली. ज्यात त्यांनी पतंजली आयुर्वेद विरोधात कोर्टाच्या कडक टीकेबद्दल बोलले. आश्वासनानंतर पतंजलीने प्रसारमाध्यमांमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे सर्वोच्च न्यायालय संतप्त झाले.त्यानंतर त्यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. सुप्रीम कोर्टानेही वृत्तपत्रात माफीनामा प्रसिद्ध केला होता.