समाजाला जोडत सामाजिक परिवर्तनाचा रा.स्व. संघाचा संकल्प

0

 

“समरसता” रणनीती नव्हे, निष्ठेचा विषय आहे : दत्तात्रेय होसबाळे

नागपुर: सामाजिक समरसता हा संघाच्या रणनीतीचा भाग नसून, निष्ठेचा विषय आहे. सामाजिक परिवर्तन एका संघटनेचे काम नव्हे समाजातील विविध क्षेत्रातील सज्जनशक्तीच्या एकत्रीकरणातून व सामूहिक प्रयत्नातूनच होईल. संपूर्ण समाजाला जोडून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने समोर जाण्याचा संघाचा संकल्प आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी अखिल भारतीय प्रतिनिधी सभास्थळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक घटनेतून समाजाच्या सक्रिय भागीदारीचा अनुभव सर्वांनी घेतला याकडे होसबाळे यांनी यावेळी लक्ष वेधले. गेल्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या कामाचे मूल्यमापन 4 जून रोजी जनताच करेल असे एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

या तीन दिवसीय अखिल भारतीय वार्षिक प्रतिनिधी सभेतच विद्यमान सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांची या पदावर फेरनिवड झाली. अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती देत त्यांचे अभिनंदन केले.
एका प्रश्नाचे उत्तर देताना होसबाळे म्हणाले की, निवडणूक ही देशाच्या लोकशाहीचा महोत्सव आहे. देशामध्ये लोकशाही आणि एकतेला अधिक मजबूत करणे आणि प्रगतीची गती कायम ठेवणे आवश्यक आहे. संघाचे स्वयंसेवक 100 टक्के मतदानाकरिता समाजामध्ये जनजागरण करतील. समाजामध्ये या संदर्भात कोणतेही वैमनस्य, फुटीरता, वेगळेपणा किंवा एकतेविरुद्ध कोणतीही कृती होऊ नये, याबाबत समाजाने जागृत रहावे.

2025 च्या विजयादशमीपर्यंत सर्व नगर, सर्व खंड म्हणजे तालुके तसेच सर्व मंडल स्थानी दैनिक शाखा तसेच साप्ताहिक मिलनाचे लक्ष्य पूर्ण होईल. संघाच्या कार्याचा प्रभाव आज समाजामध्ये दिसत आहे. संघाबाबत समाजाच्या मनामध्ये जी आत्मीयतेची भावना आहे, त्याबद्दल समाजाप्रती धन्यता व कृतज्ञतेचा भाव आमच्या मनात आहे. ते परखडपणे म्हणाले की, संपूर्ण समाज संघटित व्हावा हेच संघाचे स्वप्न आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि सामाजिक समरसता हे कोणत्याही एका संघटनेचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे अभियान आहे.

दरम्यान, संदेशखाली प्रकरणातील अपराध्यांना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी पीडित महिलांच्या प्रतिनिधी मंडळाने महामहिम राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. संघाचे स्वयंसेवक व संघ प्रेरित संघटना त्यांच्यासोबत आहेत. आम्ही अल्पसंख्यकवादावर आधारित राजकारणाचा विरोध करतो.

मागील काही दिवसांमध्ये मणिपूरमध्ये जे सामाजिक संघर्ष झाले, ते अत्यंत पीडादायक आहेत. आम्ही दोन्ही समाजाच्या नेत्यांशी संवाद साधून परिस्थिती सामान्य करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले असेही त्यांनी सांगितले.