
सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कॉंग्रेसवर डागली तोफ
मुंबई(Mumbai):सॅम पित्रोदा यांनी वारसाहक्क करासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचे पितळ उघड झाले आहे. यासाठीच काँग्रेसला जनतेच्या वैयक्तिक मालमत्तेचे सर्वेक्षण करायचे आहे असा हल्लाबोल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बुधवारी केला. पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा देशासमोर आला. सामान्य जनतेची खासगी मालमत्ता ही सरकारी तिजोरीत टाकून त्याचे वाटप अल्पसंख्यंकांना करायचा काँग्रेसचा छुपा अजेंडा आहे अशी तोफही श्री.शाह यांनी काँग्रेसवर डागली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशातील नागरिकांच्या संपत्तीची पाहणी करण्याचा उल्लेख आहे. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना अल्पसंख्यंकांबाबतचे केलेले वक्तव्य आणि आता सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेचा हवाला देत संपत्तीच्या वितरणावर आणि वारसाहक्क करावर चर्चा व्हायला हवी, अशी केलेली टिप्पण्णी यातून काँग्रेसला देशातील दलित, आदिवासी, मागास जनतेऐवजी विशिष्ट समुदायाचे कल्याण करायचे आहे, हेच दिसून येते, असे श्री. शाह यांनी म्हटले आहे.
श्री. शाह म्हणाले की, बहुसंख्यंकांची मालमत्ता जप्त करून तिचे वाटप हे अल्पसंख्यंकांमध्ये करून मुस्लीम अनुनयाची काँग्रेसची छुपी खेळी सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे उघड झाली आहे. यामागचा काँग्रेसचा हेतू जनतेने गांभीर्याने लक्षात घ्यावा असा इशारा ही त्यांनी दिला. ते म्हणाले की, काँग्रेसला देशातील गोरगरीब,शोषित, वंचित ,दलित आणि मागासवर्गीयांचे भले कधीच करायचे नव्हते. देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्यांकांचा, म्हणजे मुस्लिमांचा आहे असा दावा 2006 मध्येच तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केला होता. आता काँग्रेस सत्तेवर आल्यास तो प्रत्यक्षात आणला जाईल आणि गरीबांकडील संपत्ती हिरावून घेतली जाईल असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला. या नीतीनुसार काँग्रेसला सर्वसामान्यांच्या संपत्तीचे वाटप अल्पसंख्यंकांमध्ये करायचे आहे हे स्पष्ट झाले असून काँग्रेसने एकतर आपल्या जाहीरनाम्यातून हा मुद्दा काढून टाकावा किंवा आपले धोरण मान्य करावे असे आव्हान त्यांनी काँग्रेसला दिले.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नेहमीच देशाच्या साधनसंपत्तीवर गरीब, दलित, मागासलेल्या लोकांचा, आदिवासींचा हक्क आहे असे स्पष्ट केले आहे आणि मोदी सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजनांमधून त्याचा प्रत्यय ही जनतेने घेतला आहे. याउलट काँग्रेसला नेहमीच व्होटबॅंकेवर डोळा ठेवून मुस्लीमांचे लांगुलचालन करायचे आहे असे टीकास्त्र श्री. शाह यांनी सोडले. काँग्रेसच्या या तुष्टीकरणाच्या घातक राजकारणाविरोधात देशातील जनतेने आवाज उठवायला हवा असे ही श्री. शाह म्हणाले.
















