काँग्रेस नागपुरातून फुंकणार लोकसभा निवडणुकीचा बिगुल!

0

नागपूर NAGPUR : इंडिया आघाडीची महारॅली नागपुरात आयोजित करण्याची चर्चा मागील काही महिन्यात सुरु होती. मात्र, आता इंडिया आघाडीतील काँग्रेस पक्ष वर्धापन दिनानिमित्त येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरात महारॅली आयोजित करणार असून या महारॅलीच्या माध्यमातून लोकसभा-२०२४ साठीचा बिगुल फुंकला जाणार असल्याचे संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत. या महारॅलीसाठी नागपूरशहरालगत मैदानाचा शोध काँग्रेस पक्षाकडून सुरु आल्याची माहिती आहे. (Congress to Start LS Election Campaign from Nagpur)
नागपुरात होणाऱ्या महारॅलीस काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महासचिव प्रियांका गांधी व देशभरातील प्रमुख नेते येणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व मुकुल वासनिक यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेऊन महारॅलीच्या तयारीची सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अन्य नेत्यांनी महारॅलीच्या स्थळाचा शोध सुरु केल्याची माहिती आहे. या महारॅलीस दहा लाख लोक उपस्थित रहावे, यासाठी प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रदेश काँग्रेसची टीम त्यासाठी कामाला लागली आहे. काल रात्री वडेट्टीवार यांच्याकडे बैठक होऊन त्यात पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी आदी उपस्थित होते. या बैठकीत संभाव्य सभास्थळांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. महारॅलीसाठी दाभा येथील मैदान, डिगडोह येथील प्रियदर्शनी कँपस तसेच उमरेड मार्गावरील दिघोरीच्या पलिकडे असलेल्या मैदानांचे प्रस्ताव विचाराधीन असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसात मैदान निश्चित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.