नागपुरात आज काँग्रेस निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

0

(Nagpur)नागपूर : स्थापना दिनाच्या ‘है तैय्यार हम’ महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस आज नागपुरातून लोकसभा-२०२४ निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. या निमित्ताने प्रतिस्पर्धी भाजपला नागपुरातूनच आव्हान देण्याचे काँग्रेस पक्षाचे प्रयत्न असले तरी विरोधकांची एकजूट साधण्याच्या दृष्टीने काँग्रेस इंडिया आघाडीला नेमका काय संदेश देणार, याकडेही आघाडीतील घटक पक्षांचे लक्ष लागले आहे. आज होणाऱ्या महारॅलीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे सहभागी होणार असल्याची माहिती आहे. तर सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी नागपुरात येणार नसल्याची माहिती काँग्रेसच्या गोटातून दिली जातेय. (Congress Maharally in Nagpur)

काँग्रेसच्या या महारॅलीसाठी देशभरातील काँग्रेस नेते नागपुरात दाखल होत आहेत. काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने ही महारॅली होत असली तरी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शंखनाद यानिमित्ताने होणार आहे. भाजप आणि देशातील जनतेला संदेश देण्याच्या निमित्ताने काँग्रेसने महारॅलीसाठी नागपूरची निवड केली आहे. त्यामुळे या महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस भाजपला कोणते आव्हान देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. मात्र, त्यापेक्षाही इंडिया आघाडी मजबूत करण्याच्या दिशेने काँग्रेस आपल्या आघाडीतील सहकाऱ्यांना काय संदेश देणार, याकडेही लक्ष लागलेले आहे. इंडिया आघाडीच्या तीन ते चार बैठका झाल्या असला तरी सर्वात महत्वाची म्हणजे जागावाटपाची प्रक्रिया अद्याप पार पडलेली नाही. आघाडीत काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत राहणार असली तरी अनेक राज्यांत काँग्रेसला प्रबळ अशा प्रादेशिक सहकारी पक्षांपुढे नमते घ्यावे लागणार आहे. जागावाटपात तडजोड करावी लागणार आहे. काँग्रेसची ती तयारी आहे का, याचे संकेत काँग्रेसच्या महारॅलीतून मिळू शकतील.