
भाजपमध्ये केला प्रवेश
नागपूर NAGPUR : काँग्रेसमधून निष्काशीत करण्यात आलेले नेते ASHISH DESHMUKH आशिष देशमुख यांनी आज अखेर भाजपमध्ये पुनर्प्रवेश केला. काँग्रेस हा ओबीसीद्रोही पक्ष असल्याची टीका करताना आशिष देशमुख यांनी काँग्रेस आता म्हातारी झाली असल्याचा टोलाही लगावला.
कोराडी येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. आशिष देशमुख यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. झालेल्या चुका विसरून माझी घरवापसी होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आशिष देशमुख यांनी काँग्रेस आणि गांधी परिवारावर निशाणा साधला. काँग्रेस व गांधी परिवार ओबीसीद्रोही असल्याची टीका करून आशिष देशमुख म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी ओबीसींबद्दल जे वक्तव्य केले, त्याबद्दल माफी मागावी, अशी माझी मागणी होती. मात्र, राहुल गांधींनी माफी मागितली नाही. याच राहुल गांधींनी राफेल घोटाळ्यासंदर्भात जे काही बेताल वक्तव्य केले होते, त्याबद्दल त्यांना कोर्टाने खडसावले होते. त्यानंतर राहुल गांधींनी माफी मागितली होती. चौकीदार चोर है, या वक्तव्याबद्दलही राहुल गांधींनी माफी मागितली होती. मात्र, ओबीसींबद्दल अवमानजनक वक्तव्य करूनही राहुल गांधींनी माफी मागितली नाही. मी तशी मागणी करताच माझे निलंबन करण्यात आले, असे देशमुख म्हणाले.
निवडणूक लढवणार नाही
मी भाजपमध्ये कुठल्याही पदासाठी प्रवेश केलेला नाही असा दावा करून आशिष देशमुख म्हणाले की मी लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढविणार नाही. या निवडणुकांमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे. भाजप विधानसभा आणि लोकसभेसाठी जो उमेदवार उभा करेल त्याला निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. काँग्रेस आता म्हतारा पक्ष झाला आहे. येत्या निवडणुकांत काँग्रेस काहीही कामगिरी करू शकत नाही. पूर्वी माझा काँग्रेसकडे कल असला तरी यापुढे मी भाजपसोबतच राहणार, अशी ग्वाही देतो. मी विदर्भात भाजपचे २०-२५ आमदार तरी निवडून आणू शकतो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली होती. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले होते. आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्यापायी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.