नवी दिल्ली- नवी दिल्लीतील १९८४ च्या शीख विरोधी दंगलीतील एका प्रकरणात काँग्रेस नेते सज्जन कुमार आणि इतर आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. हे प्रकरण तीन शीखांच्या कथित हत्येशी संबंधित होते. बुधवारी पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने एका प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली असली तरी एका प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्याने ते कारागृहातच राहणार आहेत.
1984 मध्ये झालेल्या दंगलीत शीख पिता-पुत्राची हत्या करण्यात आली होती. जमावाने जसवंत सिंग आणि तरुण दीप सिंग यांची हत्या केली होती. यावेळी काँग्रेस नेते सज्जन कुमार या जमावाचे नेतृत्व करत असल्याचा आरोप आहे. त्यांनीच बाप-लेकास जाळून टाकण्यासाठी चिथावणी दिल्याचे आरोप होते. सज्जन कुमार यांच्यावर जसवंत सिंग आणि तरुण दीप सिंग यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचाही आरोप आहे. दिल्लीच्या सरस्वती विहार पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सज्जन कुमार यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांना 6 एप्रिल 2021 रोजी अटक करण्यात आली. सध्या ते याच दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीखविरोधी दंगल उसळली होती.













