

भंडारा-गोंदियातील 7 मतदारसंघावर काँग्रेसने ठोकला दावा
गोंदिया (Gondia) :- राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची महाविकास आघाडी आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या दररोज चर्चा रंगलेल्या असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडाऱ्यात मात्र काँग्रेसनं वेगळी चूल मांडल्याचं चित्र बघायला मिळालंय. नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यातील साकोली इथं भंडारा जिल्ह्यातील तीन आणि गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात काँग्रेसकडून निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. यावेळी एका उमेदवाराला दहा मिनिटं देण्यात आलीत.
दरम्यान, अनेकांनी मोठं शक्तीप्रदर्शन करीत पक्षाकडं दावेदारी केली आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या निर्देशानुसार या मुलाखती घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर साकोलीतून दावेदारी करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र या मुखतीला दिसले नाहीत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सातही विधानसभेवर यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी दावा सांगितलेले आहे. आज मुलाखती झाल्यानं काँग्रेस या सातही जागा सोडणार नसल्याचं चित्र बघायला मिळत आहे. एकंदरीतचं काँग्रेसनं घेतलेल्या निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखत घेतल्यानं, काँग्रेस राज्यात स्वतंत्र लढण्याची तयारी किंवा वेगळी चूल तर मांडत नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.