संविधानाचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसचेच

0

नागपूर (Nagpur), 13 एप्रिल : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार असल्याचा आरोप काँग्रेसवाले करतात. पण केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयातील 7 न्यायाधीश आणि सरन्यायाधीश यांनी ‘घटनेचे मूलतत्त्व बदलता येणार नाहीत’ असा निर्णय दिलेला आहे. पण याच काँग्रेसवाल्यांनी 80 वेळा घटना बदलली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याचे पाप काँग्रेसने केल्याची टीका केंद्रीय मंत्री गडकरी (Union Minister Gadkari)यांनी आज, शनिवारी केली.

नागपुरातील नरेंद्र नगर येथील लक्षवेध मैदानावर, भेंडे ले-आऊट मैदान आणि पांढराबोडी येथे नितीन गडकरी यांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते सुबोध मोहिते, माजी महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मानकर, माजी नगरसेवक अविनाश ठाकरे, माजी नगरसेवक संदीप गवई, माजी नगरसेवक रमेश सिंगारे, माजी नगरसेवक किशोर वानखेडे यांची उपस्थिती होती.

यावेळी गडकरी म्हणाले की, गेल्या 60 वर्षांत काँग्रेसने जेवढी कामे केली नाहीत, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कामे भाजपने अवघ्या 10 वर्षांत देशात, राज्यात आणि शहरात केली आहेत. काँग्रेस नेत्यांनी आपल्या कार्यकाळात फक्त स्वार्थ साधल्याची टीका गडकरींनी केली. ‘मिहानला काही लोकांनी खूप विरोध केला होता. परंतु, आज त्याच मिहानमध्ये हजारो तरुणांना रोजगार मिळत आहे. देशातील आणि विदेशातील मोठ्या कंपन्या मिहानमध्ये आल्या आहेत. मिहानचा विस्तार करण्याचाही विचार सुरू आहे, याचा गडकरींनी आवर्जून उल्लेख केला. ‘कृषी क्षेत्रात मी नवनवीन प्रयोग करतो आणि शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन देतो. मध्य भारतातील सर्वांत मोठे ऍग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन दरवर्षी आयोजित करतो. पण निवडणूक किंवा राजकारण बघून शेतकऱ्यांसाठी ऍग्रोव्हिजनचे आयोजन करत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत, त्यांच्याकडे सुख-समृद्धी नांदावी यासाठी माझे प्रयत्न असल्याची भावना गडकरी यांनी व्यक्त केली.