
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून संख्याबळ घटल्याने आता विरोधी पक्ष नेते पद कोणाकडे येणार, याकडे लक्ष लागले आहे. (Congress Claim on Leader of Opposition) राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांचे नाव या पदासाठी निश्चित करण्यात आले असले तरी आता काँग्रेसने देखील या पदावर दावा केला आहे. विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय पक्षाकडून नव्हे तर विधानसभेच्या अध्यक्षांकडून होत असतो, याकडे लक्ष वेधत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार तसेच गट नेते बाळासाहेब थोरात यांनीही या पदावर काँग्रेसचा दावा मांडला आहे.
नागपुरात बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, विरोधी पक्ष नेतेपद नेमके कोणाकडे असावे, हे संख्येवरून ठरविले जाते. या पक्षाच्या आमदारांची संख्या अधिक राहील, त्याच पक्षाचा विरोधी पक्षनेते राहणार आहे. त्यामुळे हा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांनी दंगली घडवल्या, जातीय तेढ निर्माण करून पाहिले. पण, त्यांना यश आले नाही. आपला पाय खोलात जात असल्याचे लक्षात आल्यानेच सत्ताधाऱ्यांनी हा नवा प्रयोग केला असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. कालची फूट ही अनपेक्षित होती, असे म्हणणे चुकीचे आहे. ते अपेक्षितच होती व अजित पवारांना समजाविण्याचे शरद पवारांचे प्रयत्न सुरू होते. पण त्यांना थांबायचे नव्हते. सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते राहू शकत नाही. सत्ता गेली त्या दिवसापासून धुसफुस वाढली होती. दादांचा कल सत्तेकडे होता, हे पवार साहेबांसह त्यांच्या इतर नेत्यांच्या लक्षात आले होते. शरद पवारांनी समजवण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रकरण त्यांच्याही आवाक्याबाहेर गेले, असेही वडेट्टीवार म्हणाले.
आगामी अधिवेशन हे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे अखेरचे अधिवेशन असेल. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरविल्यावर नेमके काय, याची तजवीज भाजपने करुन ठेवली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.