सेक्युलर’ आणि ‘सोशलिस्ट’ शब्द वगळल्याचा काँग्रेसचा आरोप

0

नवी दिल्ली-भारताच्या राज्यघटनेच्या नव्या प्रतींमध्ये उद्देशिकेतून मोदी सरकारने सेक्युलर आणि सोशलिस्ट शब्द वगळल्याचा आरोप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने केला आहे. या उद्देशिकेचे फोटो देखील विरोधकांनी ट्विट केले आहेत. (Congress on Secular and Socialist words) मुळात, घटनेतील उद्देशिकेतील पहिल्या ओळीत भारताचं वर्णन हे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाहीवादी असे करण्यात आले आहे. धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द वगळण्यात आले असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. दरम्यान, राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष असे शब्द त्यात नव्हते. राज्यघटनेच्या 42व्या घटनादुरुस्तीत हे शब्द जोडण्यात आले आहेत, असे सरकारने स्पष्ट केले.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, हे शब्द 1976 मध्ये दुरुस्तीनंतर जोडण्यात आले असल्याची आम्हाला कल्पना आहे. पण, आज जर कोणी आम्हाला संविधान देत असेल आणि हे शब्द त्यात नसतील तर ही चिंतेची बाब आहे. भाजपचा हेतू संशयास्पद आहे. हे अत्यंत हुशारीने केले आहे. ही माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. हे आपली राज्यघटना बदलण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न दर्शवते, असा आरोपही त्यांनी केला.