

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत गोंधळ!
मतदान केंद्रावर दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये तणाव, मतदान केंद्र अडवण्याचा प्रयत्न
चंद्रपूर | प्रतिनिधी
तब्बल तेरा वर्षांनंतर होत असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आज मतदानादरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. चंद्रपूर शहरातील एका मतदान केंद्रावर दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. सुभाष रघाताटे यांच्या समर्थकांनी मतदान केंद्राचे मुख्य दरवाजे आतून बंद करत केंद्र अडवण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या उमेदवार दिनेश चोखारे यांच्या समर्थकांनी बाहेरून दरवाजे ठोठावत जोरदार आक्षेप नोंदवला.
या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मतदान केंद्रप्रमुखांनी तात्काळ हस्तक्षेप करत केंद्राचा मार्ग मोकळा केला. मात्र, या गोंधळामुळे मतदान प्रक्रियेला अडथळा आल्याने उमेदवार दिनेश चोखारे यांनी संबंधित केंद्रावरील मतदान रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाचीही तारांबळ उडाली.
बँकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 21 संचालक पदांपैकी 9 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरित 12 जागांसाठी आज (10 जुलै) मतदान होत आहे. यात ओबीसी प्रवर्गासाठी 4, अनुसूचित जाती-जमातीसाठी 5 आणि भटक्या विमुक्त गटासाठी 3 जागांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये 14 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत असून त्यासाठी शंभरहून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी 11 जुलै रोजी चंद्रपूर शहरातील चांदा इंडस्ट्रियल इस्टेट येथे होणार आहे.
या निवडणुकीसाठी काँग्रेसने खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या समन्वयातून बँकेवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला आहे. तर भाजपकडून आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र आघाडी उभारण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्व भाजप आमदारांना एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार हे निश्चित आहे.
“मतदान केंद्रावर झालेल्या या गोंधळामुळे मतदान प्रक्रिया पारदर्शकतेत झाली नाही. आम्ही संबंधित केंद्रावरील मतदान रद्द करण्याची मागणी केली आहे.”
— दिनेश चोखारे, उमेदवार