‘चित्रार्थ-2024’ मध्‍ये विविध कलांचा संगम

0

 

‘डॉली चायवाला’, ‘ट्रान्‍सजेंडर’ नि ‘पावर ऑफ वन वोट’

नटराज आर्ट अँड कल्‍चर सेंटरच्‍या कला प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

नागपूर (Nagpur ), 29 मार्च 2024
मायक्रोसाफ्टचे संस्‍थापक बिल गेट्स ज्‍याच्‍या प्रेमात पडले तो नागपूरचा स्‍टाईलिश ‘डॉली चहावाला’, ‘ट्रान्‍सजेंडर’ सारखा बहुचर्चित विषय, आणि लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर मतांची ताकद दर्शविणारे ‘पावर ऑफ वन वोट’ यारख्‍या अनेक विषयावर आधारित चित्रप्रदर्शनी ‘चित्रार्थ – 2024’ मध्‍ये विविध कलांचा संगम बघायला मिळाला.

धरमपेठ एज्‍युकेशन सोसायटीच्‍या नटराज आर्ट अँड कल्‍चर सेंटर, नागपूरच्‍या वार्षिक कला प्रदर्शन ‘चित्रार्थ – 2024’ चे उद्घाटन शुक्रवारी नटराज आर्ट गॅलरी येथे थाटात उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्‍हणून भारत सरकारच्‍या वस्‍त्रोद्योग मंत्रालयाच्‍या हस्‍तकला सेवा केंद्राचे सहायक संचालक अवदेश ठाकूर होते तर विशेष अतिथी म्‍हणून प्रसिद्ध चित्रकार बिजय बिस्‍वास, धरमपेठ एज्‍युकेशन सोसायटीचे अध्‍यक्ष उल्‍हास औरंगाबादकर, सचिव मंगेश पाठक, नटराज आर्ट अँड कल्‍चर सेंटरचे प्राचार्य डॉ. रवींद्र हरीदास व प्रदर्शनीचे संयोजक डॉ. सदानंद चौधरी यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. या प्रदर्शनीत बीएफए व एमएफए चे पहिल्‍या ते अंतिम वर्षाचे विद्यार्थ्‍यांनी उपयोजित कला, पेंटींग, मूर्तिकला, भरतनाट्यम, कथक असा विविध कला येथे प्रस्‍तुत केल्‍या. ‘प्री ह‍िस्‍टॉरिक’ अशी मध्‍यवर्ती संकल्‍पना असलेल्‍या या चित्रप्रदर्शनीमध्‍ये भारतात असलेल्‍या 38 गुहांमधील रॉक पेंटीगची माहिती देखील देण्‍यात आलेली आहे.

अवदेश ठाकूर यांनी विद्यार्थ्‍यांच्‍या कलाकृतींचे तसेच, नटराजद्वारे विद्यार्थ्‍यांसाठी राबविण्‍यात येणा-या अशा उपक्रमांचे कौतुक केले. विजय बिस्‍वास यांनी विद्यार्थ्‍यांनी तयार केलेल्‍या कलाकृती उच्‍च दर्जाच्‍या असून कलाक्षेत्रातील त्‍यांच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍याची वाट मोकळी करून देणा-या आहेत, असे उद्गार काढले. उल्‍हास औरंगाबादकर यांनी सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विविध पुरस्‍कार वितरीत करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवंती काटे यांनी प्रास्‍ताविक डॉ. रवींद्र हरिदास यांनी तर आभार प्रदर्शन मौक्तिक काटे यांनी केले. राधिका कुळकर्णी, स्‍नेहल वारे, जिशा नायर, शय‍रीप्रिया मेघे व वैदेही तेलंग यांनी कथक व भरतनाट्यम नृत्‍य प्रस्‍तुत केले.

हे प्रदर्शन 1 एप्रिल पर्यंत सकाळी 11 ते 7 वाजेदरम्‍यान सर्वांसाठी खुले राहणार असून दररोज दुपारी 3 वाजता राजीव चौधरी, मंगेश राऊत व मौक्तिक काटे यांचे अनुक्रम कॅलिग्राफी, फोटोग्राफी व स्‍कल्‍पचर विषयावर लेक्‍चर डेमॉन्‍स्‍ट्रेशन सादर केले जात आहे.