

नागपूर:-‘पर्यटन धोरण – 2024’ हे देशातील सर्वोत्तम धोरण असून यात ऐतिहासिक, सांस्कृतिक, वन, समुद्र, धार्मिक, मेडीकल, साहसी पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यात विदर्भाला झुकते माप कसे देता येईल याचा अधिकाधिक प्रयत्न करण्यात आला असून हे धोरण महाराष्ट्राला देशात आघाडीवर नेणारे ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र शासनाचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
खासदार औद्योगिक महोत्सवांतर्गत असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) च्यावतीने आयोजित ‘पर्यटन धोरण 2024 : ॲडव्हान्टेज विदर्भ कॉन्क्लेव्ह’ च्या समारोपीय सत्रात शनिवारी ते ग्रँड एअरपोर्ट बँक्वेट, साउथ मेट्रो स्टेशन येथे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी होते तर मंचावर हॉटेल सेंटर पॉइंटचे व्यवस्थापकीय संचालक जसबीरसिंह अरोरा, हॉटेल अशोकचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, एनआरएचएचे अध्यक्ष व एआयडीच्या पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे संयोजक तेजिंदर सिंग रेणू, तथास्तू रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक अनिल अग्रवाल, एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे, उपाध्यक्ष गिरधारी मंत्री, कोषाध्यक्ष राजेश बागडी, प्रशांत उगेमुगे आदींची उपस्थिती होती. सीएसी ऑलराउंडरचे संचालक अमोल खंते यांनी सुरू केलेल्या ‘रामाच्या गावाला जाऊया’ या निसर्ग सौंदर्य व धार्मिक साहसी ग्रामीण पर्यटन सहलीच्या अभिनव प्रकल्पाच्या लोगोचे नितीन गडकरी व गिरीश महाजन यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
गिरीश महाजन यांनी राज्यातील पर्यटन वाढीचे श्रेय नितीन गडकरी यांना दिले. ते म्हणाले, नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील रस्ते चांगले झाल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले आहे. दोन वर्षापूर्वी या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर चार महिन्यात तयार करण्यात आलेल्या या धोरणात एआयडीचे महत्वाचे योगदान आहे.
पर्यटन म्हणजे केवळ आर्थिक स्त्रोतांची निर्मिती नसून त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळावा, हा उद्देश आहे. अशिक्षितांपासून ते उच्च शिक्षितांपर्यंत सर्वांना रोजगार उपलब्ध करून देणारे हे क्षेत्र आहे, असे सांगताना त्यांनी आई योजनेद्वारे महिला पर्यटनालाही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सांगितले.आशिष काळे यांनी पर्यटन धोरणातसंदर्भातील सूचनांचे निवेदन गिरीश महाजन यांना सादर केले. वृषाली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर गिरधारी मंत्री यांनी आभार मानले.
महाराष्ट्राने जगातले सर्वात उत्तम पर्यटन धोरण आणल्याबद्दल गिरीश महाजन यांचे अभिनंदन करताना नितीन गडकरी यांनी पर्यटकांना महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी अभिनव कल्पना राबवाव्या, असे आवाहन केले. महाराष्ट्रातले 75 टक्के जंगल विदर्भात असून येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. प्रत्येक गेटवर गाड्यांच्या संख्येला मर्यादा घातल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सफारीसाठी आता वापरण्यात येत असलेल्या इलेक्ट्रीक गाड्यांमुळे ध्वनी व वायू प्रदूषण कमी होणार आहे. त्यामुळे गाड्यांची संख्या तीन पटीने वाढवल्यास, पर्यटकांची संख्या वाढेल व रोजगारही वाढेल, असे नितीन गडकरी म्हणाले. त्यांनी महामार्गावर सुरू करण्यात येत असलेल्या ‘हमसफर’ योजनेचीदेखील माहिती दिली.