श्री चैतन्यपीठ वर्धापन दिन सोहळ्याचा समारोप

0

ब्रह्मपरंपरेतील सद्गुरूपूजनाचा हा सोहळा – जितेंद्रनाथ महाराज
प.पू. बाबामहाराज तराणेकर यांचा हृद्य सत्‍कार

परंपरा या गंगेसारख्‍या अनंत मार्गी असतात. आध्‍यात्मिकतेची परंपरा सद्गुरूंनी भावबंधाच्‍या गाठी मारल्‍यामुळे पुढे जात असते. सद्गुरू आत्‍म्याचा बोध करून देणारे असतात. सद्गुरू नानामहाराजांची परपंरा चालवणारे बाबामहाराजांच्‍या सत्‍काराचा सोहळा म्‍हणजे सद्गुरूपूजनाचा सोहळा आहे, अशा शब्‍दात श्री देवनाथ मठाचे पीठाधिश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराजांनी भावना व्‍यक्‍त केल्‍या.

अखिल भारतीय त्रिपदी परिवार आणि श्री शांतिपुरुष सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीचैतन्यपीठाचा वर्धापन दिन महोत्सव, तसेच श्री बाबामहाराज तराणेकर यांच्या 75 व्या वर्षात पदार्पणानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा मंगळवारी थाटात पार पडला. शिवाजीनगर येथील शिवाजी सभागृहात मंगळवारी झालेल्‍या या कार्यक्रमात योगी परम पूज्‍य सद्गुरू श्री नाना महाराज तराणेकर यांचे उत्‍तराधिकारी साहित्यिक, समाजसेवक, संशोधक, लेखक, संपादक आध्‍यात्मिक गुरू श्री बाबामहाराज तराणेकर यांचा श्री देवनाथ मठाचे पीठाधिश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज, धर्मभास्‍कर सद्गुरूदास महाराज यांच्‍या हस्‍ते हृद्य सत्‍कार करण्‍यात आला. श्री शांतिपुरुष सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष राजीव हिंगवे, जयश्री तराणेकर यांची उपस्‍थ‍िती होती. श्री नृसिंह सरस्‍वती स्‍वामी महाराज संस्‍थान कारंजा, दत्‍त संस्‍थान गाणगापूर, मूकबधिर विद्यालय शंकरनगर, यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक संस्‍थांकडून बाबा महाराज तराणेकर यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
जितेंद्रनाथ महाराजांनी भगवंत साधनेचे पंचाहत्‍तर वर्ष पूर्ण केल्‍याबद्दल बाबामहाराजांचे अभिनंदन केले. बाबामहाराजांची पंचाहत्‍तरी, शांतिपुरूष मासिकाचा रौप्‍य महोत्‍सवी वर्ष, श्री चैतन्‍यपीठाचे एक तप असा त्रिवेणी संगम झाला असल्‍याचे ते म्‍हणाले.

साधना हिंगवे यांनी गौरवपर लेखाचे वाचन केले तर निखिल मुंडले व संपदा तुमडे यांनीही शुभेच्‍छा दिल्‍या. रुपाली बक्षी यांनी करुणा त्रिपदी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गलांडे यांनी केले.

नानामहाराजांचा आध्‍यात्मिक वारसा – सद्गुरूदास महाराज

प.पू. नानामहाराज देहातीत असून त्‍यांच्‍या कार्याचा आणि कीर्तीचा सुगंध बाबामहाराज जगभर दरवळवण्‍याचे काम करीत आहेत. वैज्ञानिकाची दृष्‍टी असलेल्‍या बाबामहाराज नानामहाराजांचा आध्‍यात्मिक वारसा पुढे चालवत आहेत, अशा शब्‍दात कौतुक करीत धर्मभास्‍कर सद्गुरूदास महाराजांनी बाबामहाराजांचे अभिनंदन केले. बाबा महाराजांची वाणी मूकबधिरांपर्यंतदेखील पोहोचते, हे या मूकबधिर मुलांकडून झालेल्‍या सत्‍कारातून दिसून येते, असे ते म्‍हणाले.

जंगमतीर्थाचा झाला लाभ – बाबामहाराज तराणेकर
आज माझ्यावर स्‍तुतीसुमनांचा तसेच, आशीर्वचनाचा वर्षाव झाला. त्‍यामुळे सुखद अनुभूती मिळाली आहे. यानिमित्‍ताने सद्गुरूदास महाराज व जितेंद्रनाथ महाराज यांचा सत्‍संग लाभला. संतांना जंगमतीर्थ म्‍हणतात. अशा जंगमतीर्थाचा आपल्‍याला लाभ झालेला आहे. हे हृदयीचे ते हृदयी झाले आहे, असे बाबामहाराज तराणेकर सत्‍काराला उत्‍तर देताना म्‍हणाले.

शांतीपुरूष वैदिक स्‍थापत्‍य विद्यापीठाची घोषणा
वैदिक धर्मात स्‍थापत्‍य शास्‍त्र परिचित होते. त्‍याचे पुनरुज्जिवन व्‍हावे या दृष्‍टीने शांतीपुरूष वैदिक स्‍थापत्‍य विद्यापीठाची घोषण करण्‍यात आली. भावी पिढ्यांना हजारो वर्षांची स्‍थापत्‍य परंपरेचा अभ्‍यास करता यावा व तयाचे महत्‍त्‍व पटावे आणि त्‍याची उत्‍सूकता जागरूक होऊन. त्‍याचे कुलपती म्‍हणून बाबामहाराजांची नियुक्‍ती करण्‍यात आली असल्‍याची घोषणा राजीव हिंगवे यांनी प्रास्‍ताविकातून केली.