
१० हजार व्यक्तींनी घेतला लाभ
कळमेश्वर/नागपूर – 22 मार्च २०२५ – नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे नुकत्याच आयोजित दोन दिवसीय प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा व आरोग्यशिक्षण शिबिरात सुमारे १०,००० हजार लोकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. मेडिसेवातर्फे स्कूल ऑफ मेडिकल अँड हेल्थ रिसर्च सेंटर (एसएमएचआरसी) यांच्या सहकार्याने ब्राह्मणी, कळमेश्वर येथील स्मृती विद्यालयात सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आजाराचे लवकर निदान करणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा व आरोग्यशिक्षण यावर या शिबिरात भर देण्यात आला. या उपक्रमात वैद्यकीयतज्ज्ञांची चमु सहभागी झाली होती.
यामध्ये डॉ. ऋषभ (वैद्यकीय), डॉ. ऋतुजा (सामुदायिक वैद्यक), डॉ. संभवी (दंतचिकित्सा), डॉ. हीना (बालरोगतज्ज्ञ), सुदीपांश (नेत्ररोग), निराली (नेत्ररोग विद्यार्थी),दोन परिचारिका विद्यार्थी आणि मेडिसेवा फील्ड एक्झिक्युटिव्ह यांचा समावेश होता. या तज्ज्ञांनी सामान्य आरोग्य तपासणी, दंतचिकित्सा, बालरोग तपासणी, नेत्रतपासणी तसेच आरोग्यविषयक जागरूकता सत्रे घेतली आणि आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवल्या. या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना मेडिसेवाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विशेष कासलीवाल म्हणाले की , “हे आरोग्य तपासणी शिबिर ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सेवांमधील दरी भरून काढण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग आहे’.
















