धावपट्टीचे काम एक महिन्यात पूर्ण करा – गडकरी

0
धावपट्टीचे काम एक महिन्यात पूर्ण करा - गडकरी
धावपट्टीचे काम एक महिन्यात पूर्ण करा - गडकरी

विमानतळाची नवीन धावपट्टी महिनाभरात
पूर्ण करा- गडकरी

नागपूर(Nagpur)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन धावपट्टीच्या कामाला वेळ लागत असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे काम एक महिन्या पूर्ण करा, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा गडकरी यांनी संबंधित कंपनीला दिला.

विमानतळ प्राधिकरणाने डिसेंबर 2023 मध्ये धावपट्टीच्या कारपेटिंगची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानंतर 1 मे 2024 रोजी के. जी. गुप्ता कंपनीला या कामाचे कार्यादेश देण्यात आले. मात्र, अद्याप धावपट्टीचे काम पूर्ण झालेले नाही. यासंदर्भात अनेक तक्रारी गडकरी यांना प्राप्त झाल्या होत्या. शिवाय, धावपट्टीच्या कामामुळे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत नागपूर विमातळावरील आवागमन बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विमानांच्या तिकिटांचे दरही दुप्पट-तिप्पट प्रमाणात वाढलेले आहेत. नियमित विमान प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास होत आहे. याची दखल घेत नितीन गडकरी यांनी आज, सोमवारी 23 डिसेंबर रोजी धावपट्टीच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार मोहन मते, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य गिरधारी मंत्री, प्रकाश भोयर, दिलीप जाधव, मिहानच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, विमानतळ प्राधिकरणारे अधिकारी तसेच के.जी. गुप्ता कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

कंपनीला मे 2024 मध्ये कार्यादेश मिळाल्यावर जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर 1 ऑक्टोबर 2024 रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या दरम्यान काही कारणांनी काम बंद होते. त्यानंतर 24 नोव्हेंबरपासून पुन्हा कामाला सुरुवात झाली. पहिल्या लेअरचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या लेअरचे काम पूर्ण होण्यासाठी 21 मे 2025 पर्यंतचा कालावधी लागेल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले होते. धावपट्टीचे काम संथगतीने सुरू असल्याबद्दल गडकरींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी आणखी 5 महिने सर्वसामान्य नागरिकांना विमान प्रवासाची भाडेवाढ सोसावी लागणे योग्य नाही, याकडेही मिहान व कंपनीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर एक महिन्याच्या आत धावपट्टीचे काम पूर्ण करावे. अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा स्पष्ट इशारा गडकरी यांनी दिला.