

नागपूर (Nagpur),
नावीन्य कला अकादमी, लयशाला कथक नृत्य साधना केंद्र व रंजन कला मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ‘कमल’ या हिंदी नृत्य नाटिकेचे सादरीकरण झाले. लयशालेच्या 35 विद्यार्थिनीनी कमळाचे अष्टगुणी प्रकटीकरण करीत अप्रतिम शास्त्रीय नृत्यातून त्यात रंग भरले.
यावेळी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, अनघा सराफ, पल्लवी उपदेव, प्रसिद्ध कथ्थक गुरू ललिता हरदास, माधुरी अशिरगडे, सारिका पेंडसे, संजय पेंडसे, निखिल मुंडले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. नुपूर जोगळेकर यांनी सरस्वती वंदना सादर केली.
यावेळी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी नुकताच 24 तास दोसे बनविण्याचा विश्वविक्रम केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.माधुरी अशिरगडे यांनी यावेळी ‘कमल’ या नृत्यनाटिके मागील भूमिका विशद केली.भारतमातेचे आसन असलेले कमळाचे फुल आणि त्याच्या अष्टगुणांनी युक्त आठ पाकळ्यांचे गुणवैशिष्ट्य या नृत्य नाटिकेद्वारा व्यक्त करण्यात आले आहेत. यामध्ये 4 पाकळ्या स्त्री-प्रधान, यात त्यागाचं प्रतीक असलेली सीता, भक्तीचं प्रतीक आश्रमकन्या नंदिनी, सेवेचं प्रतीक असलेली आश्रमवासिनी दासी आणि श्रद्धेचं प्रतीक असलेली मीरा यांचा समावेश आहे, तर पुरुषप्रधान 4 पाकळ्यांमध्ये शौर्याचं प्रतीक भरत, वैराग्याचे प्रतीक शुकमुनी, औदार्याचं प्रतीक कर्ण आणि पराक्रमाचें प्रतीक दाखविले गेले.
नृत्य नाटिकेची निर्मिती, लेखन, संगीत दिग्दर्शन माधुरी अशिरगडे यांची होती. नृत्य दिग्दर्शन पल्लवी क्षीरसागर-उपदेव यांचे, मार्गदर्शन, निवेदन संजय आणि सारिका पेंडसे यांचे होते. सूत्रधार अनिल पालकर, मीनल मुंडले होते. या नृत्य नाटिकेचे गायन सीमा दामले, अंबरिश जोगळेकर, सई चिटणीस, नुपूर जोगळेकर यांनी केले. सूत्र संचालन आणि आभारप्रदर्शन सारंग उपदेव यांनी केले. दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या संगीतमय कार्यक्रमात रसिकांची मोठी उपस्थिती होती.