

अॅग्रो व्हिजनमधील आधुनिक तंत्रांच्या स्टॉलला शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर, 26 नोव्हेंबर
माणसांच्या आरोग्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्यासाठी ‘स्मार्ट वॉचेस’ Smart watches सारखी इतर उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. पण, मनुष्याची दुधाची गरज भागवणा-या गायींच्या आरोग्याचे रक्षण व्हावे व तिने पौष्टीक दूध द्यावे यासाठी अमेरिकत स्थायिक झालेले नागपूरचे उद्योजक आशिष सोनकुसरे यांनी ‘‘काऊ कॉलर टाय’’ तयार केला आहे. ‘‘लोका वान’’ या तंत्राचा वापर करून त्यांनी या बेल्टची निर्मिती केली असून हा कॉलर टाय गायीचे तापमान व इतर शारीरिक नोंदी ठेवते. शेतक-यांसाठी अशा अनेक आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त उत्पादनांचे प्रदर्शन अॅग्रोव्हिजन मध्ये करण्यात आले असून त्याला शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
आशिष सोनकुसरे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी या टायचे प्रोटोटाईप तयार केले होते. या स्टार्टअपची फॅक्टरी आता नागपूरच्या औद्योगिक वसाहतीत स्थापन केली जाणार असून नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या यांच्या त्याचे उत्पादन केले जाईल. आतापर्यंत या ‘काऊ कॉलर टाय’चे 8000 नग शेतकर्यांनी विकत घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतक-यांना शेती लाभदायी ठरावी, त्यातून अधिक उत्पन्न मिळावे, श्रमाची बचत व्हावी, यासाठी त्याला नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या मूळ संकल्पनेतून अॅग्रो व्हिजन प्रदर्शनमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त विविध उपयोगी साहित्याचे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
ऊसाचा रस काढण्याची अभिनव मशीन
ऊसाचा रस काढण्यासाठी हँडमेड आणि मोटर ऑपरेटेड मशीनचा सामान्यत: वापर केला जातो. पण पुण्याच्या एका नवउद्योजकाने ‘गारवा’ या ब्रँड नेमअंतर्गत आवाजरहित ऊसाचा रस काढण्याची मशीन प्रदर्शनात ठेवली आहे. अल्पश्रमात आवाज न करता घरच्या घरी वापरता येणारी ही ऊसाचा रस काढायची मशील रस काढल्यानंतर ऊसाचे चिपाड बाहेर काढून टाकते. स्वयंरोजगार करणार्या महिलादेखील सुलभतेने या मशीनचा याचा वापर करू शकतात.
बांबूचे दागिने नि पर्स
प्रदर्शनात ओपन स्टॉल एरियामध्ये बांबूपासून तयार केलेला अभिनव, आकर्षक उत्पादने लक्षवेधी ठरत आहे. यात महिलांसाठी पर्स, की-चेन, विविध आकर्षक दागिने, शो पिसेस, ब्ल्यूटूथ स्पिकर, खुर्च्या, टेबल, आलिशान झोपाळ, तसेच, डायनिंग टेबलवरील वस्तू, चहा-कॉफीचे मग, कुल्हड, लॅम्पशेड आदी वस्तू बघायला मिळतात.
याशिवाय, नितीन गडकरी यांनी उद्घाटीत केलेले ग्रीव्हज कॉटन लिमिटेडचे बायोफ्यूअल जेनसेटदेखील प्रदर्शनात बघायला मिळतील. हे जेनसेट बायो डिसेल आणि इथॅनॉलयुक्त इंधनावर चालते. नितीन गडकरी व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते विमोचन करण्यात आलेले महिंद्रा ग्रुपचे सीएनजी ट्रॅक्टर तसेच, इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेडची बायो-बिटूमेन उत्पादने देखील येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
हे प्रदर्शन उद्या 27 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत चालू राहील. त्वरा करा आणि या अभिनव प्रदर्शनाला भेट द्या, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.