

उभं राहावं की मोडून पडावं हा एकच सवाल आहे. ह्या मालवणच्या राजकोट किल्ल्यावर भ्रष्टाचाराच्या भुशाने भरलेला भुसभुशीत धातूंचा पुतळा होऊन उभं राहावं बेशरम लाचार आनंदान? का फेकुन द्यावं या बेगडी देहाचं लक्तर समुद्राच्या अथांग लाटांवर?
आणि करावा भ्रष्टाचारी राजवटीचा शेवट एकाच प्रहाराने? माझा, तुझा, ह्याचा अन त्याचाही.
काळाच्या इवल्याशा तडाख्याने माझ्या अस्तित्वालाच असं नख लावावं . . . की नंतर होणा-या छिन्नविच्छिन्न तुकड्यांना नसावा जागृतीचा किनारा कधीही..
पण मग..
पण मग त्या छिन्नविच्छिन्न तुकड्यांच्या स्वप्नातही भवानी माता येऊ लागली तर? त्यांनाही पुन्हा संपूर्ण स्वराज्याचं स्वप्न पडू लागलं तर? आपल्या नावाचं राजकारण करणारे औरंगे त्यांच्याही डोळ्यात सलू लागले तर?
तर…तर…
इथेच मेख आहे. जुन्या धेंडांच्या काळया कारनाम्यांना कंटाळून आपण नव्यांच्या हाती कारभार सोपवावा अन् ते नवे, जुन्यापेक्षाही गयेगुजरे निपजावेत?
काही काळ आम्ही सहनही केली ती नव्याची नवलाई, मिरविण्याची घाई, जनतेप्रती बेपर्वाई!
सहन केले प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे अत्याचार …
आमच्या माता बहिणींवर होणारे बलात्कार…
अस्तित्वाच्या गाभा-यात असणा-या सत्वाची विटंबना..
आणि आज अखेर सहनशक्तीचा बांध फुटून कोसळून पडलो या दर्यामातेच्या पायाशी.
विधात्या, तु इतका कठोर का झालास?
एका बाजुला आम्ही ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी आमचा वापर करून घेतला आणि दुस-या बाजुला आमच्या सन्मानाच्या नावाखाली त्यांनी आमचे असे कचकड्यांचे पुतळे उभारले.
पण मग या कोसळलेल्या पुतळ्याच्या, विस्कटलेल्या लोखंडाचे, पत्र्याचे अन् काँक्रीटचे भग्नावशेष घेऊन हे करुणाकरा…
या छत्रपतींनी कुणाकुणाची बोटं छाटावित? कुणाकुणाची मुंडकी उडवावित? कुणाकुणाचा टकमक टोकावरून कडेलोट करावा? कुणाकुणाचा चौरंग करावा? कुणाचा? कुणाचा?? कुणाचा???
– सॅबी परेरा