

सामाजिक न्याय, सुरक्षा, स्मारक उभारणी, आरोग्य, नक्षलग्रस्त भागासंदर्भात महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश
चंद्रपूर (Chandrapur):- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली व सविस्तर निवेदन सादर केले. यामध्ये सामाजिक न्याय, सुरक्षा, स्मारक उभारणी, आरोग्य, नक्षलग्रस्त भागासंदर्भात महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश आहे. तर बल्लारपूर मतदारसंघातील विकासकामे, वीज वितरण केंद्रे, शेतकऱ्यांचे प्रश्न, अपघातग्रस्तांना मदत आदी विषयांवर आ. श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) महोदयांसोबत सविस्तर चर्चा केली.
आ. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी निवेदनामध्ये कृषीपंपाचा विषय मांडला. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या वीज जोडणीमध्ये झालेल्या त्रुटींमुळे नुकसानभरपाई देण्याची व कंपनीच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना रब्बी हंगाम २०२४-२५ मधील धानाचे चुकते पैसे तातडीने अदा करावेत, सफाई कामगारांच्या वारसदारांना नगरपरिषद व महानगरपालिकांच्या सेवेत सामावून घ्यावे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीररत्न जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा सिंदखेडराजा, बुलढाणा येथे बसविण्यात यावा, आदी मागण्यांचाही यामध्ये समावेश होता.
बल्लारपूर मतदारसंघातील विकासकामे, वीज वितरण केंद्रे, शेतकऱ्यांचे प्रश्न, अपघातग्रस्तांना मदत आदी विषयांवर चर्चा
आ. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील वगळलेले नऊ तालुके पुन्हा नक्षलग्रस्त म्हणून घोषित करावेत, अशी मागणी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना केली. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रलंबित देयके त्वरीत अदा करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातही निवेदन दिले. यासोबतच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मुल येथील पॉलिटेक्निक कॉलेज व कृषी महाविद्यालयासंदर्भातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला.
मुल शहर व मुल ग्रामीण शाखा कार्यालयाचे विभाजन करून राजोली येथे नवीन वीज वितरण केंद्र स्थापन करण्याची मागणी तसेच पोंभुर्णा शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवेगाव मोरे येथे नवीन वीज वितरण केंद्र निर्माण करण्याचा प्रस्ताव आ. श्री. मुनगंटीवार यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला.
बल्लारशाह (Ballarshah) रेल्वे पोलीस दुरक्षेत्राचे श्रेणीवाढ करून स्वतंत्र रेल्वे पोलीस ठाण्यात रूपांतर करण्याची विनंती आ. मुनगंटीवार यांनी केली. अपघातात मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लक्ष रुपयांची मदत मंजूर करण्याची मागणी करण्यात आली असून, त्यामध्ये पोंभूर्णा तालुक्यातील मौजा भटाळी येथील रंजीता तोडासे, ईश्वर कुसराम, शुल्का आलाम व प्रकाशनगर महाकाली कॉलनी (चंद्रपूर) येथील सुजेन सय्यद (वय ४) या मृतकांच्या कुटुंबीयांना ५ लक्ष रुपयाची मदत मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.