
17MNAT4 हिमाचलप्रदेश : ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू 3 जखमी
कुल्लू, 17 जुलै : हिमाचल प्रदेशाच्या कुल्लू येथील कियास गावात आज, सोमवारी सकाळी ढगफुटी झाली. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. तर 9 वाहने पाण्यात वाहून गेली.
हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, दिल्ली या राज्यात पावसाचा प्रचंड उद्रेक वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून यमुना आणि गंगेच्य पुरामुळे जनता त्रस्त झाली आहे. हिमाचल सोबतच उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी आता धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचली आहे. हरिद्वारमध्ये गंगेची पाण्याची पातळी 293.15 मीटर नोंदवण्यात आली, तर धोक्याचे चिन्ह 294 मीटर आहे. नदीलगतच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.देवप्रयाग येथे गंगा नदी 20 मीटरने आणि ऋषिकेशला पोहोचेपर्यंत 10 सेमी वाढली. वाराणसी आणि प्रयागराजमध्ये घाट बुडू लागले आहेत. काही छोटी मंदिरे आधीच पाण्याने भरली आहेत.
दुसरीकडे, दिल्लीत सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत यमुनेच्या पाण्याची पातळी 205.50 मीटरवर पोहोचली. गेल्या तीन तासात 205.45 च्या पातळीपर्यंत नोंद झाली. हिमाचल प्रदेशमध्ये पुरामुळे ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना 1 लाख 45 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. हरिद्वारमध्ये गंगेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. चेतावणी पातळी 293 च्या जवळ पोहोचली आहे. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये केदारनाथकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांतील 17 तालुक्यांतील 386 गावे पुराच्या विळख्यात असून, त्यामुळे 78 हजार लोक बाधित झाले आहेत.
दरम्यान हवामान खात्याने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक येथे मुसळधार आणि बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, सिक्कीम, आसाम, मेघालय, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी येथे विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.