‘वेस्टर्न डिस्टबर्न्स’मुळे हवामानात बदल

0

 

देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता

नवी दिल्ली NEW DELHI 30 जानेवारी : ‘वेस्टर्न डिस्टबर्न्स’मुळे Western Distburns  पुन्हा एकदा देशाच्या हवामानात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात काही भागात थंडीची तीव्र लाट पाहायला मिळत असून काही भागात पावसाची शक्यता आहे.

उत्तर भारतात तीव्र थंडी आणि दाट धुक्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक प्रभावित झाली आहे. दिल्लीत 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीतील दिवसाच्या तापमानात आणखी घट होऊ शकते. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, 2 वेस्टर्न डिस्टर्बन्स आता भारताच्या दिशेने येत आहेत. एका वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम वायव्य हिमालयावर दिसून येत आहे आणि दुसरे वेस्टर्न डिस्टर्बन्स 31 जानेवारीच्या आसपास सक्रिय होण्याची शक्यता आहे. या दोन वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे, पश्चिम हिमालयात पूर्वीच्या हिवाळ्याच्या हंगामापेक्षा जास्त पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच देशात अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसात जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टीची शक्यता आहे. तसेच 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी हिमाचल प्रदेशवर आणि 2 फेब्रुवारी उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे. तसेच, पंजाब आणि हरियाणाला तसेच आसपासच्या भागात हलक्या गडगडाटी वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशसह प्रदेशांमध्ये 3 फेब्रुवारीपर्यंत मध्यम पाऊस किंवा हिमवृष्टी अपेक्षित आहे. काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज आहे.