
नवी मुंबई(New Mumbai) 5 जून :- माझी वसुंधरा अभियानांतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार बेलापूर कार्यक्षेत्रातील तलया येथील कांदळवन क्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिका व हेंकेल ग्रुप आणि महाविद्यालयीन एनएसएसचे (NSS) विद्यार्थी यांच्या एकत्रित सहभागातून विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आली.
या मोहीमेत सहभागी होत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे आणि पर्यावरणाचे महत्व विषद केले. याप्रसंगी परिमंडळ 1 उपआयुक्त श्री सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. शशिकांत तांडेल यांनी सक्रिय सहभाग घेतला. उपस्थितांनी सामुहिकरित्या माझी वसुंधरा अभियानाची सामुहिक शपथ घेतली. या मोहिमेत सहभागी सर्व स्वयंसेवकांनी कांदळवन क्षेत्रातील साधारणत: 100 कि.ग्रॅ. प्लास्टिक व तत्सम कचरा गोळा केला. यावेळी बेलापूर विभागाचे कर्मचारी व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
















