

नागपूर ( Nagpur):- संपत्तीसाठी वयोवृद्ध सासर्याला कारखाली चिरडून जीव घेतल्याची थरारक घटना 22 मे रोजी अजनी पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पुरुषोत्तम पुट्टेवार (82) असे मृतकाचे नाव आहे. हत्या करण्यासाठी सूनेमार्फत आरोपींना सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल तपास करून 6 आरोपींना अटक केली. तसेच आतापर्यंत 17 लाखांची रक्कम आणि सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. अर्चनाचा भाऊ प्रशांत पार्लेवार (58) रा. उंटखाना रोड आणि अर्चनाची सहकारी आर्किटेक्ट पायल नागेश्वर (25) या दोघांनाही अटक करण्यात आली असून, बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. मृतकाची सून अर्चना पुट्टेवार (53) तसेच तिचा सहकारी नीरज निमजे, सचिन धार्मिक, सार्थक बागडे यांना आधीच अटक करण्यात आली आहे. सचिन आणि नीरजला 12 जूनपर्यंत पीसीआर आहे, तर सार्थकला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पुढील चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यातील मुख्य आरोपी अर्चनाला कारागृहात पाठविण्यात आले आहे. आता नव्याने दोघांना अटक करण्यात आल्याने एकूण संपत्ती किती याचा खुलासा होईल.
घटनेपूर्वी म्हणजे 8 आणि 16 मे रोजी पुरुषोत्तम यांना अपघात करून मारण्याची घटना घडली. घटनेनंतर त्यांना मुलगा डॉ. मनीष पुट्टेवार यांच्या रुग्णालयात नेले होते. मात्र, किरकोळ जखम आणि वयोवृद्ध असल्याने डॉ. मनीष यांना कुठलीच शंका आली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रारदेखील केली नव्हती. तिसरा प्रयत्न 22 मे रोजी झाला. मानेवाडा रोडकडून बालाजीनगरकडे जाणार्या मार्गावर त्यांचा अपघात झाला. सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. सखोल तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाले.
पत्रकार परिषदेला सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस आयुक्त निमित गोयल उपस्थित होते.
सासर्याच्या हत्येची 50 लाखांत सुपारी
अर्चना ही गडचिरोली नगर रचना विभागात सहायक संचालक आहे. तिने सासर्याच्या हत्येची पन्नास लाखांत सुपारी दिली. जुनी कार विकत घेण्यासाठी सचिनला पैसे दिले. सचिन, सार्थक आणि नीरजने घाटरोड येथून आय-20 जुनी कार विकत घेतली. घटनेच्या वेळी अर्चना आरोपींच्या सतत संपर्कात होती, तर सचिन हा शुभम हॉस्पिटल, मानेवाडा येथे होता. पुरुषोत्तम यांचा पाठलाग करून तो त्यांचे लोकेशन साथीदार नीरज आणि सार्थक यांना देत होता. त्याने दिलेल्या लोकेशनवरून नीरज आणि सार्थक यांनी पुरुषोत्तमचा पाठलाग करीत कारने धडक दिली. या अपघातात पुरुषोत्तम यांचा मृत्यू झाला. पुरुषोत्तम यांचा अपघात करून जीव घेण्यासाठी अर्चनाने आरोपींना रोख रक्कम आणि दागिने दिले होते. त्यापैकी तीन लाख रुपये, एक 40 ग्रॅमची सोन्याची बांगडी, शंभर ग्रॅमचे सोन्याचे बिस्किट, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अशी आहे साखळी अन् नाते
मृतक पुरुषोत्तम पुट्टेवार यांना डॉ. मनीष, हेमंत आणि योगिता अशी तीन मुले आहेत. तिघेही विवाहित आहेत. अर्चना ही मनीषची पत्नी आहे. अर्चना आणि प्रशांत हे बहीण-भाऊ आहेत. योगिताचे लग्न अर्चनाच्या भावासोबत झाले होते. मात्र, तिच्या पतीचे निधन झाले. तेव्हापासून योगिता ही माहेरीच राहते. तिच्या सासरच्या संपत्तीचा वाद न्यायालयात आहे. वडील म्हणजे पुरुषोत्तम तिच्या न्यायालयीन प्रकरणाचा पाठपुरावा करायचे. अर्चना आणि प्रशांत यांच्यात तिसरा हिस्सा योगिताचा पडणार होता. त्यामुळे न्यायालयात पाठपुरावा करणार्या पुरुषोत्तम यांचा काटा काढण्यासाठी सून अर्चनाने सुपारी दिल्याचे डॉ. सिंगल यांनी सांगितले.