वाढलेल्या वीजबिलांमुळे नागरिक हैराण

0

 अनेकांचे बजेट कोलमडले

(Nagpur)नागपूर– राज्यात १ एप्रिलपासून लागू झालेल्या वीज दरवाढीनंतर आलेल्या भरमसाठ बिलांमध्ये नागरिकांवर डोळे पांढरे होण्याची पाळी आली आहे. उन्हाळात वीजेचा उच्चांकी वापर होत असताना वाढीव बिलांमुळे नागरिकांचे बजेट कोलमडले असून अनेकांवर वीज बिलाचा भरणा कसा करायचा, असा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने १ एप्रिल, २०२३ पासून नवी वीजदरवाढ लागू केली आहे. आयोगाने महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी वीज कंपनीचे २०२३-२४ आणि २४-२५ चे घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक, कृषी आदी विविध संवर्गातील ग्राहकांचे वीजदर जाहीर केले आहेत. चारही वीज कंपन्यांच्या स्थिर आकार आणि वीज दरात वाढ झाली असून, सरासरी वीज पुरवठय़ाचा दर साडेनऊ रुपये प्रति युनिटहून अधिक झाला आहे. आयात कोळशाच्या दरात झालेली मोठी वाढ, करोनाकाळात उत्पन्नात झालेली घट, पारेषण खर्चात झालेली वाढ आणि अन्य कारणांमुळे वीज कंपन्यांचा खर्च वाढल्याने ही दरवाढ मंजूर करण्यात आली आहे.

महावितरण कंपनीने ६७ हजार ६४३ कोटी रुपयांची महसुली तूट भरून काढण्यासाठी दरवाढीची मागणी केली असताना, आयोगाने ३९ हजार ५६७ कोटी रुपयांची वाढ दोन वर्षांसाठी मंजूर केली आहे. इंधन समायोजन आकार समाविष्ट करून महावितरणने २०२३-२४ साठी १४ टक्के, तर २४-२५ साठी ११ टक्के दरवाढ मागितली होती. मात्र, आयोगाने ती अनुक्रमे २.९ आणि ५.६ टक्के इतकी मंजूर केली. त्यात महावितरणने ० ते १०० युनिटसाठी ४.४१ रुपये (जुना दर ३.३६ रुपये), १०१ ते ३०० युनिटसाठी ९ रुपये ६४ पैसे ( जुना दर ७.३४ रुपये), ३०१ ते ५०० युनिटसाठी १३.६१ रुपये (जुना दर १०.३७ रुपये), ५०१ ते १००० युनिटसाठी १५.५७ रुपये (११.८६ रुपये), १००० आणि त्यावरील युनिटसाठी १५.५७ रुपये (११.८६ रुपये) असे दर लागू केले आहेत. ऐन वीज वापर सर्वाधिक असणाऱ्या एैन उन्हाळ्यात ही वीजदर वाढ लागू झाली आहे. त्यामुळे त्यामुळे मे व जून महिन्यात आलेल्या बिलांचे आकडे पाहून सर्वसामान्य लोकांना मोठा धक्का बसला. या वाढीमुळे आर्थिक वर्ष 2025 पर्यंत निवासी विजेच्या दरात 6 टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये औद्योगिक वीज दर 1 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 4 टक्के वाढले आहेत. अदानी, टाटा पॉवर, बेस्ट या खासगी कंपन्यातील वीज कंपन्यांचेही दर भरमसाठ वाढले आहेत.

दरम्यान, (State Electricity Consumers Association President Pratap Hogade)राज्य वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी या दरवाढीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रत्यक्षात ही दरवाढ २१.६५ टक्के असल्याचा आरोप केला आहे. या दरवाढीविरोधात न्यायाधीकरणाकडे अपिल दाखल केले आहे. महावितरणकडून कृषी वीज पुरवठ्याची पुढे केली जाणारी आकडेवारी दिशाभूल करणारी असून प्रत्यक्षात कमी वीज पुरविली जात असल्याचा आरोप होगाडे यांनी केला आहे. वीज गळती आणि महावितरणच्या नाकर्तेपणामुळेही परिस्थिती उद्भवल्याचा त्यांचा आरोप आहे.