

सिमेंट रस्त्यांच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्टाचार, आता आम्ही करणार महायुती सरकारला हद्दपार
नागपूर (Nagpur), ता. 9 नोव्हेंबरः गेल्या काही वर्षात नागपूर शहराच्या विस्ताराची गती वाढली आहे. मात्र शहरातील अनेक भाग आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. शहरातील अनेक भागात रस्ते नसताना सुस्थितीत असलेले अनेक रस्ते खोदून त्याठिकाणी सिमेंट रस्ते तयार करुन त्यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार महायुती सरकारच्या नेत्यांकडून सुरु आहे. त्यामुळे आता सामान्य जनताच या भ्रष्ट महायुती सरकारला हद्दपार करणार असल्याचे प्रतिपादन नागपूर दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी केले. शनिवारी सकाळी पदयात्रेदरम्यान नागरिकांनी सिमेंट रस्ते बांधल्यामुळे घरात पाणी शिरल्याची तक्रार केली. त्यासंदर्भात गुडधेंची नागरिकांशी चर्चा झाली.
पदयात्रेची सुरुवात आज (ता. 9 नोव्हेंबर) रोजी सकाळी आठ वाजता सोमलवाडा येथून जाली. त्यानंतर राहुल नगर, महात्मा फुले नगर, तपोवन, गोविंद नगर, सीतानगर, राजीव नगर, गांगुली नगर, खामला, मिलिंद नगर मार्गे दक्षिण पश्चिम नागपुरातील नागरिकांशी गुडधे यांनी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. याशिवाय सामान्य नागरिकही स्वतः या पदयात्रेत सहभागी होऊन महायुती सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात रस्त्यावर उतरले आहे.
रविवारी सायंकाळी दोन सभा
नागपूर दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी दोन सभांचे आयोजन करण्यात आले असून प्रामुख्याने प्राध्यापक.श्याम मानव, काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, विधानपरिषदेचे आमदार ॲड. अभिजित वंजारी मार्गदर्शन करणार आहेत. पहिली सभा 7.30 वाजता एकात्माता नगर जयताळा येथे होईल तर दुसरी सभा 8.30 वाजता दाते लेआऊट मैदान जयताळा येथे होणार आहे.