

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण
चंद्रपूर |शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा हे प्रभावी माध्यम आहे, तर शिक्षक हा त्याचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
ते छोटुभाई पटेल हायस्कूलमध्ये आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत उभारण्यात आलेल्या ६ डिजिटल वर्गखोल्यांच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी आदर्श शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुनील पटेल, कार्याध्यक्ष जिनेश पटेल, सचिव जितेंद्र पटेल, कोषाध्यक्ष अतुल पटेल, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांत (वैद्य) मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. छोटुभाई पटेल यांच्या तैलचित्राला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पणाने झाली. त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर आमदार जोरगेवार यांच्या हस्ते डिजिटल वर्गखोल्यांचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, “शाळेच्या विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल. त्यांच्या प्रगतीसाठी निधीअभावी कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही. येत्या काळात उर्वरित वर्गखोल्याही डिजिटल करण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन बम सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.