“चित्रार्थ कलाकुंभ – 2025 ” प्रदर्शनाचा थाटात समारोप

0

धरमपेठ एज्‍युकेशन सोसायटी संचालित नटराज आर्ट अँड कल्चरल सेन्टरच्‍यावतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या ‘चित्रार्थ कलाकुंभ – 2025’ वार्षिक कलाप्रदर्शनीचा सोमवारी थाटात समारोप पार पडला. नटराज आर्ट गॅलरी, नटराज आर्ट अँड कॅल्चरल रजत महोत्सव धरमपेठ येथे चार दिवस चाललेल्‍या या प्रदर्शनाला विद्यार्थ्‍यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.

समारोपीय कार्यक्रमाला गव्हर्नमेंट आर्ट अँड डिजाईन कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ साबळे, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकचे बी.पी.एडचे संचालक डॉ. प्रसाद गोखले, धरमपेठ एज्‍युकेशन सोसायटीचे सचिव सुरेश देव, सीडीसी अॅड. संजीव देशपांडे, नटराज आर्ट अँड कल्चरल सेंटरचे प्राचार्य डॉ. रवींद्र हरिदास यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी विलास उजवणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्‍यानंतर श्री राम भजनावरील भरतनाट्यम व कथक नृत्य नाटिकेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. निलेश चव्हाण, नाना मिसाळ, केंद्राचे प्राचार्य डॉ. हरिदास, श्रीरामाच्या 8 फुटाच्या पादुका तयार करणाऱ्या शिक्षक, विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. विश्वनाथ साबळे यांनी आजच्‍या कृत्रिम बुद्धिमत्तेच्‍या युगात कल्पकता, सृजनाला अधिक महत्‍त्‍व प्राप्‍त होणार असून कलाकारांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार असल्‍याचे सांगितले. नागपूरच्या संस्कृतीमध्‍ये कलात्मक वातावरण तयार करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्‍यात यावे, असे आवाहन त्‍यांनी केले.

डॉ. प्रसाद गोखले म्हणाले, हे प्रदर्शन म्‍हणजे कला आणि कुंभ यांचा अद्भुत संगम असल्‍याचे सांगितले. संजीव देशपांडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. प्रास्‍ताविक डॉ. हरिदास यांनी, पाहुण्यांचा परिचय डॉ. पूजा हिरवडे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सदानंद चौधरी व अवंती काटे यांनी केले. मौक्तिक काटे यांनी आभार मानले.