

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन : अभिनेता स्वप्नील जोशी यांची उपस्थिती
देशातील नामवंत खेळाडूंचा समावेश
नागपूर (Nagpur): नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आणि लक्ष्यवेध फाऊंडेशनच्या सहकार्याने मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी, १ आणि २ मार्च २०२५ या कालावधीमध्ये स्व. रतन टाटा परिरसर लक्ष्यवेध मैदान नरेंद्र नगर येथे ही स्पर्धा पार पडेल. शुक्रवारी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता स्व. रतन टाटा परिरसर लक्षवेध मैदान नरेंद्र नगर येथे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. उद्घाटन समारंभाला सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यांची उपस्थिती असेल, अशी माहिती मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेच्या स्वागत समितीचे उपाध्यक्ष श्री. अविनाश ठाकरे यांनी गुरुवारी (ता.२७) पत्रकार परिषदेत दिली.
नरेंद्र नगर येथील लक्ष्यवेध मैदानामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, स्पर्धेचे संयोजक श्री. रितेश गावंडे, संजय पवनीकर, धनंजय वाडेकर, भूषण केसरकर, श्रीकांत दुचक्के, रमेश भंडारी आदी उपस्थित होते.
उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे वित्त, नियोजन, कृषी मदत व पुनर्वसन, विधी व न्याय कामगार राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, आमदार सर्वश्री अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ. परिणय फुके, कृपाल तुमाने, डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, मोहन मते, विकास ठाकरे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, श्री. अजय चारठाणकर यांची उपस्थिती असेल.
मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा २८ फेब्रुवारी, १ आणि २ मार्च या कालावधीत सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ५ ते १० या वेळेमध्ये खेळल्या जातील. १ मार्च २०२५ रोजी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी हे स्पर्धेला भेट देउन खेळाडूंना प्रोत्साहित करणार आहेत. स्पर्धेमध्ये देशभरातील नामवंत कबड्डीपटू सहभागी होणार आहे. स्पर्धेमध्ये पुरुषांचे २० संघ तर महिलांचे १६ संघ सहभागी होणार आहेत. स्व. रतन टाटा परिरसर लक्ष्यवेध मैदान येथे स्पर्धेसाठी ६ मैदान तयार करण्यात आलेली आहेत. स्पर्धेकरिता अखिल भारतीय कबड्डी फेडरेशनची परवानगी प्राप्त असून नागपूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मार्गदर्शनात स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धा ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनच्या अधिपत्याखाली होणार असून स्पर्धेचे निरीक्षक म्हणून श्री. सुनील चिंतलवार व कन्व्हेनर म्हणून श्री. सचिन सुर्यवंशी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, अशीही माहिती श्री. अविनाश ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था आमदार निवास येथे करण्यात आली आहे. यासाठी १६० खोल्यांचे गाळे उपलब्ध करण्यात आले आहे. सर्व खेळाडूंना रेल्वे स्टेशनवरुन निवास स्थानी घेऊन येणे तसेच त्यांना निवास ते मैदानात आणि रेल्वे स्टेशनपर्यंत सोडण्याची देखील विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी मैदानातून परिसरात सर्व खेळाडूंची रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये खेळाडूंसह मनपाचे अधिकारी, कार्यकर्ते, मुकबधिर विद्यालयाचे लेझीम पथक, मंगलदीप बँड आदींचा समावेश असेल. स्पर्धेकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या ऑर्थोपेडिक आणि फिजीओ तज्ज्ञांकडून तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील हृदयरोग तज्ज्ञ आणि रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध असणार आहे. मनपाद्वारे औषध व्यवस्था केली जाणार आहे.
स्पर्धेमध्ये देशातील अनेक नामवंत खेळाडूंच्या खेळाचा थरार अनुभवण्याची संधी नागपुरकरांना मिळणार आहे. ए मुंबाचा खेळाडू सुरेश सिंग, युपी योद्धा चा खेळाडू गौरव कुमार, हरेश कुमार, भानू तोमर, पुणेरी पलटण चा खेळाडू विशाल चौधरी, हरियाणा स्टीलर्स चा विनय तेवतिया, जयपूर पिंक पँथरचा साहुल कुमार, खेलो इंडियाचा संदेश देशमुख यांच्यासह महिलांच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू सपना खाटीया, प्रांजल, सपना, अपेक्षा टकले हे सर्व खेळाडू आपापल्या चमूकडून स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
पुरुष गटात प्रथम पुरस्कार विजेत्या संघाला २ लक्ष ५१ हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तर द्वितीय क्रमांकासाठी १ लक्ष ५१ हजार आणि तृतीय क्रमांकाला १ लक्ष १ हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. महिला गटात प्रथम क्रमांकाला १ लक्ष ५१ हजार, द्वितीय क्रमांकाला १ लक्ष १ हजार आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघाला ७१ हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, असेही श्री. अविनाश ठाकरे यांनी सांगितले.
स्पर्धेमध्ये सहभागी संघ
पुरुष संघ : सेंट्रल रेल्वे मुंबई, टीएमसी ठाणे, रुपाली ज्वेलर्स मुंबई, हिंदुजा हॉस्पिटल मुंबई, बीएमटीसी बंगळुरू, युवा पलटण पुणे, साई गुजरात, स्टार अॅकेडमी जबलपूर, वेस्ट बंगाल स्टेट, हरियाणा स्टेट, आंध्रप्रदेश स्टेट, युवा एकता लखीटी यूपी, कर्नाटक स्टेट, झारखंड स्टेट, छत्तीसगड स्टेट, बारामती स्पोर्ट्स, एनडी स्पोर्ट्स दिल्ली, जय हिंद वरोरा, राजपूत स्पोर्ट्स जानेफळ.
महिला संघ : सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, साई गुजरात, दिल्ली अकादमी, छत्तीसगड स्टेट, वेस्ट बंगाल स्टेट, तामिलनाडू स्टेट, टीएमसी ठाणे, बारामती स्पोर्ट्स, पेंढरा रोड छत्तीसगड, युवा कल्याण छिंदवाडा, सांगली स्पोर्ट्स, जैन क्लब वरोरा, रेंज पोलिस नागपूर, नागपूर जिल्हा, स्टार अॅकेडमी जबलपूर.
उडान खेल प्रोत्साहन योजनेद्वारे ७४ खेळाडूंना अर्थसहाय्य
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्याकरीता तथा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राष्ट्रीय गेम, राष्ट्रीय स्पर्धा, कनिष्ठ व परिष्ठ यांच्या स्तरानुसार पदक प्राप्त खेळाडूंना प्रोत्साहनास्तव सहाय्य देण्यास्तव मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या संकल्पनेतून ‘उडान खेल प्रोत्साहन योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मनपाकडे एकूण २३६ अर्ज प्राप्त झाले त्यातमून ७४ अर्ज पात्र ठरले. या ७४ पात्र लाभार्थ्यांना अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेमध्ये मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकूण ५७ लक्ष ८९ हजार रुपये अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस देवतळे, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बनसोड, रौनक साधवानी यांच्यासह अनेक प्रतिभावंत खेळाडूंचा समावेश आहे. मनपाद्वारे १० आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडूंना प्रत्येकी २ लक्ष रुपये, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग असलेल्या २ खेळाडूंना प्रत्येकी १ लक्ष रुपये, राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त १५ खेळाडूंना प्रत्येकी १ लक्ष रुपये, राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग असलेल्या ९ खेळाडूंना प्रत्येकी २१ हजार रुपये आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील ३८ खेळाडूंना प्रत्येकी ५० हजार रुपये अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.