“घरी बसून नंबर एकचे मुख्यमंत्री..”, एकनाथ शिंदेंची टीका

0

नागपूर NAGPUR – “कोव्हीडच्या काळात लोक मरत असताना हे लोक पैसे कात होते. काल्पनिक रुग्ण, काल्पनिक डॉक्टर दाखवण्यात आले. माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणत काही जण घरी बसून नंबर एकचे मुख्यमंत्री झाले. जनता मात्र दारोदारी फिरत राहिली”, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आज तोप डागली. दिशा प्रकरणात आधीच दिशाहीन झालेले विरोधकांचे गलबत आणखी भरकटल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे व ठाकरे गटावर बोचरी टीका केली. आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाच्या टेंडरचा पाऊस पडला असल्याचे सांगत सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी, असे मुख्यमंत्री म्हणाले. आमच्यावर टीका करताना एका मर्यादेपर्यंत टीका करावी असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिला.
शिंदे म्हणाले, आपली ओरड व आरोप किती खोटे होते हे सिद्ध झाले आहे. जलयुक्त शिवार योजना बासनात गुंडाळून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम महाविकास आघाडीने केले. केवळ सूड भावनेने राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प रखडवले गेले. चांगल्या राज्यकर्त्यांचे हे लक्षण नाही. आपल्या अहंकारापोटी राज्य मागे जाता कामा नये, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, कोविडकाळात महापालिकेत झालेला भ्रष्टाचार म्हणजे मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याचे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजानं टेंडरचा अक्षरश: टेंडरचा पाऊस पाडला. यातला एक महत्त्वाचे प्यादे म्हणजे रोमिन छेडा असून याची सुरुवात जिजामाता उद्यानातील पेंग्विनपासून सुरू झाली. हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पेंग्विनचे बांधकाम करण्याचं कंत्राट दिले. या कंपनीला तब्बल ५७ कंत्राटे देण्यात आली आहेत. त्यानंतर रस्त्यांचे काम करणाऱ्या याच कंपनीला ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचे कंत्राट देण्यात आले. याच कंपनीचं बोरिवलीत कपड्याचे दुकान असून कंत्राट मिळाल्यानंतर दोन टक्के पैसे ठेवून बाकीचे पैसे रोमिन छेडाच्या खात्यात वळवण्यात आले, असे गंभीर आरोप शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केला.