

Amit Shah Raigad Visit news :
राजमाता जिजाऊंना मनःपूर्वक प्रणाम करतो, जिजाऊंनी छत्रपतींना फक्त जन्मच दिला नाही, तर त्यांनी अनेक गोष्टी शिकवल्या.
रायगड (Raygad) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) महाराष्ट्र दौऱ्यावर असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त अमित शाह यांनी आज किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केले. यावेळी, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगताना, छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका, महाराजांकडून देश आणि जग प्रेरणा घेत असल्याचे शाह यांनी म्हटले. तसेच, रायगड (Raigad) हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनवू, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी रायगडावर आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मोठ्या मागण्या केल्या आहेत.
राजमाता जिजाऊंना मनःपूर्वक प्रणाम करतो, जिजाऊंनी छत्रपतींना फक्त जन्मच दिला नाही, तर त्यांनी अनेक गोष्टी शिकवल्या. बाल शिवाला हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा विचार त्यांनीच दिला. ह्या ऐतिहासिक स्थळावर सुवर्ण सिंहासन स्थापन झालं तेव्हाचे वर्णन करणं खरंच अवघड आहे. चारही बाजूनं शत्रूंनी घेरलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बांधला गेला आणि दिल्ली ते अटकपर्यंत सीमा गेल्या आहेत. स्वराज्याची संकल्पना येणं देखील त्याकाळात अवघड होतं. स्वधर्म आणि स्वराज्याचे महत्त्व नंतर कळायला लागले. मी अनेक नायकांची पुस्तकं वाचली आहेत. मात्र, अपराजित सेना निर्माण करणं छत्रपतींशिवाय कोणीही नाही करु शकलं. महाराजांनी आपल्याला 200 वर्षांपासूनच्या मुघलशाहीतून स्वतंत्र केलं. बंगाल, तामिळनाडू, दिल्लीपर्यंत पोहोचलो तेव्हा कळलं आपलं स्वधर्म वाचलं आहे. जेव्हा आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्षे होईल तेव्हा आपण पहिल्या क्रमांकावर असू, असा विश्वासही अमित शाह यांनी रागयगडावरुन व्यक्त केला.
छत्रपतींना महाराष्ट्रापुरते सिमीत ठेऊ नका
आलमगीर बोलणारा पराजित झाला आणि त्याची समाधी इथेच झाली. भारताच्या मुलांना आपला हा इतिहास शिकवलाच पाहिजे. महाराष्ट्रापर्यंत छत्रपतींना सिमीत ठेऊ नका, जग त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे. आक्रमणकाऱ्यांनी आपल्याला गुलामीच्या मानसिकतेत टाकले होते, अशात छत्रपतींनी स्वराज्याची संकल्पना मांडली होती. मी राजकारण करायला आलेलो नाही, मी इथे प्रेरणा आणि अनुभूती घ्यायला आलेलो आहे. शिवमुद्राचा संदेश हा आदर्श संदेश आहे. जी चेतना शिवरायांनी सुचित केली ती हिंदवी स्वराज्याची वाहक बनली. शिवराज्यभिषेक झाला ती जागा हिच, जन्म झाला हीच आणि शेवटचा श्वास देखील इथेच घेतला, असेही अमित शाह यांनी म्हटले.
टिळक अन् पुरंदरेंचेही स्मरण
लोकमान्य टिळक यांना देखील मी प्रणाम करेल, हा किल्ला तोडण्याचे काम इंग्रजांनी केले. टिळक महाराज यांनी छत्रपतींचे मूलमंत्र घेतले होते आणि त्यांनी किल्ल्यांसाठी संघर्ष केला आणि स्मारक इथेच उभारले गेले. आपण रायगड हे केवळ पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ तयार करणार आहोत, असेही अमित शाह यांनी म्हटले. मी बाबासाहेब पुरंदरे यांना देखील अभिवादन करतो, त्यांचे देखील योगदान मोठे आहे. शिवाजी महाराज यांनी प्रशासन क्षेत्रात अनेक सिद्धांत स्थापित केले, जे कॅबिनेट मंडळ आहे त्यातीलच एक आहे. सुशासन कसे असावे याचा दृष्टांत त्यांनी स्थापित केल्याचेही शाह यांनी म्हटले.