
मुंबई : आरक्षणाबाबत ARAKSHAN पक्षाला माझी भूमिका अयोग्य वाटल्यास राजीनामा देण्यास तयारी असल्याचे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तुम्ही मला राजीनामा द्यायला सांगा…लगेच देतो. भुजबळ आऊट… तर भुजबळ आऊट… खल्लास… आपल्याला त्याचे काहीच पडले नाही, असे ते म्हणाले. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी आक्रमक भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. या मुद्यावर त्यांच्या मनोज जरांगे यांच्याशी शाब्दिक चकमकी झडत आहेत. (Chhagan Bhujbal ready to resign as a minister)
अलिकडेच अजित पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या विरोधात कोणतीही भूमिका न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यावरून आता छगन भुजबळ यांनी थेट राजीनाम्याची तयारी दर्शविली असल्याचे सांगण्यात येत आहे. भुजबळ म्हणाले की, अजित पवार आमच्या पक्षातील सर्वोच्च नेते आहेत. पक्षाने सांगितल्यास राजीनामा देणार. मी ओबीसींसाठी काम करतो आणि ते मी थांबवणार नाही. जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, याबाबत स्पष्टता असू द्या. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटण्याची माझी तयारी आहे. राज्यात इतर सभांसाठी रात्री दहावाजेपर्यंतची बंधने आहेत. मग मनाज जरांगे पाटील यांच्या सभा रात्री बारा वाजेपर्यंत कशा चालतात? असा सवालही भुजबळांनी केला आहे. सर्वपक्षीय बैठकीत बीड जाळपोळीच्या घटनांवरील माझ्या प्रश्नांवर इतर नेते गप्प होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.